दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंच व शेतकऱ्यांची याबाबत बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. या आंदोलनात तालुक्यातील सरपंच सहभागी झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.
दोडामार्ग तालुक्यात मागील दोन दशकांपासून हत्तींचा उपद्रव सुरू आहे. तसेच ओंकार हत्तीने एप्रिल महिन्यात एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला पायदळी तुडवत ठार केले होते. शिवाय येथील शेतकऱ्यांच्या शेती, बागायतींचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हत्ती पकड मोहिम राबवण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेने मोठे आंदोलन केले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती.
हत्ती पकडचा आदेश निघूनही हत्ती पकड मोहीम राबविली गेली नाही. हतीबधित गावांना भेट देऊन इथून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या व हत्तीबधीत गावातील सरपंच व शेतकऱ्यांसोबत बैठक लावण्याची मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी उपवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र ती बैठक वनविभागाने न लावल्याने व हत्तीबाधित गावांची पाहणी न केल्याने अखेर सोमवारी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनात भाजपाचे नेते एकनाथ नाडकर्णी, सरपंच कळणे सरपंच अजित देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, माजी सरपंच राजाराम देसाई, मोरगाव उपसरपंच देवू पिळणकर, संजय देसाई, दत्ताराम देसाई सहभागी झाले होते.









