

वैभव नाईक : सिंधुदुर्गातील युवकांवर ५ हजारांचा बोजा
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला एआय जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक भरती प्रक्रियेची परीक्षा या जिल्ह्यात किंवा लगतच्या जिल्ह्यात न घेता पुणे, नाशिकसारख्या लांबच्या शहरांत ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील गरीब व बेरोजगार युवक-युवतींना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज भरताना परीक्षा केंद्र म्हणून पणजी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे पर्याय उपलब्ध होते. मात्र परीक्षा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अचानक ही केंद्रे बदलून पुणे, नाशिकसारख्या दूरच्या शहरांमध्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्रवास, निवास आणि अन्य खर्च मिळून सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रे जिल्ह्याबाहेर देण्यात आल्याने बाहेरील उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता वाढण्याबरोबरच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामीण भागातील अनेक युवक-युवतींनी सतराशे ते अठराशे रुपये भरून अर्ज सादर केले असून आता परीक्षेसाठी दूरच्या शहरांत जावे लागणार असल्याने त्यांना अतिरिक्त खर्चाचा मोठा फटका बसणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून गेल्या वर्षभरात जिल्ह्याने एआय क्षेत्रात देशात मोठी प्रगती केल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात जिल्ह्यात किंवा लगतच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र उपलब्ध करून देता आले नाही, ही वस्तुस्थिती चिंताजनक असल्याचेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
एवढे करूनही जिल्ह्यातील स्थानिक मुले नोकरीला लागतील की नाही?, कारण बाहेर या भरती प्रक्रिये संदर्भात दबक्या आवाजात अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरीसाठी उपेक्षित असलेल्या तरूणांच्या नुकसानीला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. हि परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच किंवा लगतच्या जिल्ह्यात झाली पाहीजे होती, परंतू आता लांबची परिक्षा केंद्र दिल्याने येथील तरूणांना अधिकचा आर्थिक भुर्दंड पडण्यास जिल्हा बँक आणि शासन जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.









