सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाने कमळ फुलवले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले या 1363 एवढे मताधिक्य घेत विजयी झाल्या त्यांना 5788 इतके मतदान झाले. तर शिंदे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या एडवोकेट निता कवीटकर यांना 4425 इतके मतदान झाले. एकूणच या निवडणुकीत भाजपाने शिंदे शिवसेनेसह विरोधकांना धोबीपछाड करत पराभवाची धूळ चारली. नगरपरिषदेवर भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले तर शिंदे शिवसेनेला 7 जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने तौकीर शेख तर उबाठाने देवेंद्र टेमकर यांच्या रूपाने नगरपरिषदेमध्ये खाते खोलले.
याठिकाणी आमदार दीपक यांना स्वतःच्याच होमपीच मध्ये पराभवाच्या रुपाने हा मोठा धक्का बसला असून भाजपाच्या विजयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, युवानेते विशाल परब यांचा करिष्मा या ठिकाणी दिसून आला.
सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक ही यावेळी अटीटटीची झाली होती, युती फिस्कटल्याने भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना एकमेकांविरोधात टाकले होते. तर आघाडीत बिघाडी झाल्याने काॅगेस स्वंतत्र निवडणुकीत उतरली होती दुसरीकडे उबाठाने मनसे व राष्ठवादी काॅग्रेस शरद पवार गटाला सोबत घेत पॅनेल उभे केले होते. एकुणच सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी या निवडणुकीत खरी लढत ही भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना अशीच पाहायला मिळाली होती. भाजपाने या निवडणुकीत आखलेली प्रचार यंत्रणा शिंदे शिवसेनेपेक्षा उजवी होती. भाजपाने श्रद्धा भोसले यांच्या रुपाने उमेदवार निश्चित केला तरी शिंदे शिवसेनेकडून शेवटपर्यत उमेदवार निश्चित नव्हता. ऐन वेळी अॅड. निता कविटकर यांना शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी देत त्यांना रिंगणात उतरवले होते. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवाराकडून मोठी ताकद लावण्यात आली होती परंतु शिवसेनेच्या तुलनेत भाजपा सर्वच पातळीवर वरचं ठरला होता एकीकडे दीपक केसरकर यांचे आजारी असल्याने ते फारसे शहरात फिरू शकले नव्हते तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख असलेले संज् परब हे स्वतः नगरसेवक पदासाठी रिंगणात असल्याने ते स्वतःच्या प्रभागांमध्ये अडकून पडले होते भाजपाने त्या ठिकाणी जोरदार व्युहरचना आखून परब यांना त्या ठिकाणी अडकवले होते एकूणच त्यामुळे इतर प्रभागांमध्ये लक्ष देण्यास संजू परब हे कमी पडले केसरकर आणि संजू परब या दोघांना फारसे सगळ्या प्रभागांमध्ये फिरताना न आल्याने भाजपला याचा फायदा होत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांच्यासह अकरा नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आणण्यास यश आले, मात्र ज्याठिकाणी सर्वाधिक ताकद लावली होती अशा प्रभाग सात मध्ये शिंदे शिवसेनेचे संजू परब यांना पराभूत करण्यात त्यांना अपयश आले. परब यांनी विरोधी उमेदवार उदय नाईक यांचा दारुण पराभव करत संजू परब यांनी आपल्या सोबत महिला उमेदवार असलेल्या प्रज्ञा नाईक यांनाही विजयी केले. शिंदे शिवसेनेचे एकूण सात नगरसेवक नगरपरिषदेवर निवडून गेले. नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये भाजपाच्या श्रद्धा भोसले यांना 5788 इतके मतदान मिळाले तर नीता कविटकर यांना 4425 एवढे मतदान मिळाले. 1364 एवढ्या मोठ्याने सौ कविटकर यांना पराभव पत्करावा लागला तर दुसरीकडे उबाठाच्या सौ सीमा मठकर यांना 2184 एवढे मतदान झाले काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांना 576 तर अन्नपूर्ण कोरेगावकर यांना 336 इतके मतदान झाले.
भाजपाने श्रद्धा सावंत भोसले यांच्या रूपाने सावंतवाडी नगरपरिषदेवर दुसऱ्यांदा कमळ फुलवण्यात यश मिळवले. यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये संजू परब यांच्या रूपाने नगराध्यक्ष निवडून आणत भाजपने केसरकर यांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावला होता. आता दुसऱ्यांदा या ठिकाणी भाजपने आपली सत्ता आणत दीपक केसरकर यांना एक प्रकारे राजकीय धक्का दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने तौकीर शेख यांच्या रूपाने नगरपरिषदेमध्ये खाते खोलले आहे. प्रभाग एक मधून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र याच प्रभागातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा पराभव या ठिकाणी भाजपाच्या दिपाली भालेकर या निवडून आल्या. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक चार मध्ये उभाठाचे देवेंद्र टेमकर हे निवडून आले या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांच्या पॅनलमधून ते निवडून आले होते. काँग्रेस आणि उबाठा यांनी या निवडणुकीत आपले खाते खोलत नगरपरिषदेच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.
चौकट
: सावंतवाडी, येथील नगरपालिकेत झालेला आमचा विजय हा विजय सर्व सावंतवाडीकरांचा विजय आहे. ज्या सावंतवाडीकरांना शहराचा विकास अपेक्षित आहे त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या होत्या या सर्व समस्या दूर करून सावंतवाडी शहराला सुंदर व विकसित शहर बनविण्याचे आमचे स्वप्न आहे व आमचे निश्चितच पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांचे आशीर्वाद व पालकमंत्री नितेश राणे व माझ्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सावंतवाडीकरांना अपेक्षित असा विकास निश्चितच करून दाखवू, असा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोंसले यांनी व्यक्त केला.
विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडीकर नागरिकांचे मनोमन आभार मानले. त्या म्हणाल्या, सावंतवाडीतील नागरिकांनी राजघराण्याला नेहमीच आपलं प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. राजघराणेने देखील सावंतवाडीच्या जनतेसाठी नेहमीच भरभरून दिले आहे. राजघराण्याचा हा लोकसेवेचा वारसा यापुढेही सुरू ठेवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपले आई-वडील तसेच राजघराण्यातील जेष्ठ मंडळींचे आशीर्वाद व त्यांनी दिलेला पाठिंबा यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव ही सावंतवाडीची शान असून तो अधिक सुंदर व आकर्षक बनविण्यासाठी काम करू. त्याचबरोबर जनतेला आवश्यक असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी तसेच येथील आरोग्य सुविधा अधिक सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करणार, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.





