ठळक घडामोडी

MS-CIT With AI कोर्सची घोषणा; डिजिटल शिक्षणात ‘क्रांती’

MKCLचा नवा अभ्यासक्रम – व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
     डिजिटल युगात संगणक व तंत्रज्ञान हे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)ने पारंपरिक एमएस-सीआयटी कोर्स अद्ययावत करून एमएस-सीआयटी विथ एआय हा नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तसेच ‘क्रांती’ या नावाने एआय टूल्स विकसित करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी दिली.
     झाराप येथील हॉटेल आराध्या येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एमकेसीएलचे सिनिअर जनरल मॅनेजर अमित रानडे, रिजनल मॅनेजर तुषार निकम, रिजनल कोऑर्डिनेटर मंगेश जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली व रायगड विभाग समन्वयक सिद्धेश गोसावी उपस्थित होते.
     समीर पांडे म्हणाले, गेल्या अडीच दशकांत तब्बल दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एमएस-सीआयटी कोर्स पूर्ण केला असून एकाच कोर्सला सर्वाधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने हा जागतिक स्तरावरील विक्रम ठरला आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल, जैविक आणि भौतिक नवकल्पनांचे अभिसरण वेगाने होत आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी एआय कौशल्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे एमएस-सीआयटीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा साक्षरता आणि क्लाउड कम्प्युटिंग यांसारख्या नवयुगीन कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. एमएस-सीआयटी व केएलआयसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘इरा क्रांती’ हा एआय आधारित पर्सनलाईज्ड चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी व्हिडिओ कंटेंट पाहताना थेट आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचा अनुभव देण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे पांडे यांनी सांगितले.
    एमएस-सीआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीसीटीपी (Certificate of Computer Typing Proficiency) हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या कोर्सद्वारे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांमध्ये ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट वेगाने टायपिंग कौशल्य विकसित केले जाते. शासकीय मान्यताप्राप्त Remington कीबोर्ड लेआउटवर सराव केला जातो. अंतिम परीक्षा Maharashtra State Board of Technical Education (एमएसबीटीई) मार्फत घेतली जाते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएसबीटीई व एमकेसीएलचे संयुक्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
एआय म्हणजे संगणकांना मानवीप्रमाणे विचार, शिक्षण व निर्णयक्षमता देणारी प्रणाली. या कोर्समध्ये ChatGPT, Google Assistant, Microsoft Copilot, Canva AI यांसारख्या साधनांचा वापर शिकविला जाणार आहे. ऑनलाइन सुरक्षितता, पासवर्ड संरक्षण, फिशिंगपासून बचाव, डिजिटल व्यवहार, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, जीमेल, गुगल ड्राईव्ह, झूम, डिजिलॉकर, यूपीआय आदी प्लॅटफॉर्म्सवर प्रशिक्षण दिले जाईल. आठवी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, गृहिणी, शिक्षक, उद्योजक, नोकरीच्या शोधात असलेले युवक-युवती हा कोर्स करू शकतात. डिजिटल कौशल्ये आज प्रत्येक क्षेत्रात आवश्यक झाली असून हा कोर्स विद्यार्थ्यांच्या सीव्हीला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, एमकेसीएल अंतर्गत KLiC (Knowledge Lit Career) ब्रँडअंतर्गत २६५ हून अधिक रोजगाराभिमुख कोर्सेस उपलब्ध आहेत. ३०, ६०, ९० व १२० तासांचे कोर्सेस राबविण्यात येतात. १२० तासांचे कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमकेसीएल प्रमाणपत्रासोबत Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) मान्यताप्राप्त गुणपत्रिका दिली जाते. Back Office, Financial Accounting, Digital Designing, Data Science, IT Hardware, Networking, Cyber Security, Software Development, Retail Management आदी विविध क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील ४,५०० हून अधिक अधिकृत केंद्रांवर एमएस-सीआयटी, सीसीटीपी व केएलआयसी कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी जवळच्या अधिकृत एमकेसीएल प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
      आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर ‘क्रांती’ची निर्मिती!
     एमकेसीएलचे एआय ‘क्रांती’ टूल्स आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारित असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!