ठळक घडामोडी

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार – आ.निलेश राणे

उत्पादन खर्च, दरातील तफावत व वन्यप्राण्यांचा उपद्रव;शेतकरी संकटात

जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची आ.निलेश राणेंशी चर्चा

कुडाळ : प्रतिनिधी
         सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी सध्या उत्पादन खर्च, अस्थिर बाजारभाव आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर न्याय मिळावा या उद्देशाने शेतकरी प्रतिनिधींनी पुढाकार घेत कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. आमदार निलेश राणे यांनी सर्व माहिती जाणून घेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
       या बैठकीत काजू उत्पादनातील वाढत्या अडचणी, बाजारातील अस्थिर दर, उत्पादन खर्चात झालेली वाढ, वन्यप्राण्यांकडून होणारा उपद्रव तसेच स्थानिक व आयात काजूतील दरातील तफावत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडावी, अशी आग्रही मागणी शेतकरी प्रतिनिधींनी आमदार निलेश राणे यांच्याकडे केली. सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, दोडामार्ग तालुका शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई आणि संघाचे खजिनदार आकाश नरसुले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडताना सखोल व अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काजूची आवक, सध्याचे बाजारभाव, स्थानिक उत्पादन व आयात काजूची प्रतवारी याबाबतची आकडेवारीही यावेळी आमदारांना देण्यात आली. विशेषतः लगतच्या गोवा राज्यात काजूसाठी मिळणाऱ्या दराचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला.
        गोव्यातील दरांच्या तुलनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव हा चिंतेचा विषय असल्याचे प्रतिनिधींनी नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून शासनाने योग्य दर धोरण आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार निलेश राणे यांनी सर्व माहिती गांभीर्याने ऐकून घेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीमुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासन पातळीवर योग्य निर्णय झाल्यास सिंधुदुर्गातील काजू उत्पादकांना दिलासा मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली..

error: Content is protected !!