सिंधुदुर्ग : माकड पकड मोहिमेत सहभागी वनविभागाची टीम.
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात उपद्रवी माकडांना जेरबंद करण्याची विशेष मोहीम वनविभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून शेतीपिकांचे होणारे नुकसान तसेच मानवी वस्तीतील धोका लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे, मात्र अद्यापही काही भागांत माकडांचा वावर असल्याने वनविभागाकडून भविष्यातही अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी उपद्रवी वन्यप्राण्यांबाबत कोणतीही अडचण असल्यास त्वरित संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी अथवा सावंतवाडी वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार यांनी केले आहे. वन्यजीव व मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण मानले जात आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून उपद्रवी माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शेतीपिकांचे नुकसान, घरांमध्ये शिरकाव तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी वनविभागाने नियोजनबद्ध कायदेशीर पद्धतीने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत सावंतवाडी वनविभागाने प्रत्येक वनपरिक्षेत्रामध्ये स्वतंत्र आर.आर.टी. (Rapid Response Team) पथक स्थापन करण्यात आले. या पथकांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत एकूण ९९७ उपद्रवी माकडे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. पकडण्यात आलेली ही माकडे मानवी वस्तीपासून दूर, नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आली आहेत.








