ठळक घडामोडी

कुडाळमध्ये उद्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन!

ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन; राज्यभरातून हजारो एसटी कर्मचारी उपस्थित राहणार

प्रलंबित वेतन व भत्त्यांवर ठराव; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार – वैभव नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
     महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (१४ मार्च) सकाळी १० वाजता कुडाळ येथील नवीन एसटी स्टँड मैदानावर होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
     कुडाळ येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर, खजिनदार राजेंद्र मोजाड, संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख अनुप नाईक, सचिव भगवान धुरी, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक तसेच युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट उपस्थित होते.
     या अधिवेशनात आमदार भास्कर जाधव, आमदार अनिल परब तसेच माजी खासदार विनायक राऊत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार महेश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यापूर्वी अकोला, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, अमरावती आणि पुणे येथे या संघटनेची अधिवेशने झाली असून या अधिवेशनातही एसटी कामगारांच्या हितासंबंधी विविध ठराव मांडले जाणार असल्याचे रेडकर यांनी सांगितले. सन २०१८ पासून कामगारांची डीए, घरभाडे भत्ता तसेच वार्षिक वेतनवाढीतील फरकाची देणी प्रलंबित आहेत. याबाबत मंत्र्यांशी अनेक वेळा चर्चा होऊनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे या प्रश्नांवर अधिवेशनात विशेष ठराव मांडले जाणार आहेत.
      यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात एसटी कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले होते. मात्र कोरोनानंतर एसटी सेवेची परिस्थिती बदलली असून कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. राज्यभरातून सुमारे तीन ते साडेतीन हजार एसटी कर्मचारी या अधिवेशनासाठी सिंधुदुर्गात येणार असून या अधिवेशनातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी जिथे गरज भासेल तिथे ठाकरे शिवसेना संघटनेसोबत ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!