गंगाराम सडवेलकर – कृष्णा धुरींची केरवडेत प्रचारफेरी; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समितीचे उमेदवार ममता राऊळ व कृष्णा धुरी यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघात जोरदार प्रचार फेऱ्या काढण्यात येत असून, घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे.
प्रचारादरम्यान विकासाचा अजेंडा थेट मतदारांसमोर मांडण्यात येत असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवारांनी व्यक्त केला.
ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरे शिवसेनेची फौज ताकदीनीशी मैदानात उतरली असून, प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक तसेच संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
यासोबतच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असून, घर टू घर प्रचार आणि प्रचार फेऱ्यांमधून जनतेशी थेट संवाद साधला जात आहे. ग्रामस्थांकडून मिळणारा प्रतिसाद सकारात्मक असून, विकासाचे व्हिजन आणि ठाकरे शिवसेनेचा वचननामा थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. आज केरवडेत प्रचार फेरी काढण्यात आली. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, प्रचारादरम्यान मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विजय निश्चित होईल, असा विश्वास पंचायत समिती उमेदवार कृष्णा धुरी व ममता राऊळ यांनी प्रचार फेरीदरम्यान व्यक्त केला.









