स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासाठी महासंघाचा पुढाकार
व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत; नवीन संकल्पनांची दिली माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा बाजार भरविण्याची जिल्हा व्यापारी महासंघाची संकल्पना आहे. या संकल्पनेबाबत लवकरच पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची लवकरच भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वाढती महागाई यामुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्यांना संरक्षण देण्यासाठी महासंघ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आठवडा बाजार एकाच दिवशी का?
सध्या वेगवेगळ्या दिवशी भरत असलेल्या आठवडा बाजारांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परजिल्ह्यातील फिरते व्यावसायिक सर्वत्र जाऊन व्यवसाय करीत आहेत. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी बाजार भरविल्यास जिल्ह्यातील स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, त्यांचा व्यापार वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले.
‘अन्न सुरक्षा’ मोहिमेला गती
व्यापाऱ्यांना कायदेशीर अडचणींपासून वाचवण्यासाठी जिल्हाभर अन्न सुरक्षा परवाना प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून कोणतीही अप्रिय कारवाई होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणावर भर
व्यापार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र महिला व्यापारी संघटनांची उभारणी सुरू आहे. महिला सक्षमीकरणाला महासंघ विशेष प्राधान्य देणार आहे.
विविध उपक्रमांची आखणी
महासंघाच्या अंतर्गत सर्व उपसमित्या अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. तसेच महासंघाच्या वतीने पुढील तीन वर्षांत सभासद संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे, प्रशिक्षण, कर प्रणालीविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. बाजारपेठांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ग्रामीण भागात अग्निशमन सुविधा उभारण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.
महासंघासाठी स्वतंत्र व्यापारी भवन उभारण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार असून, संघटनेला अधिक लोकाभिमुख करण्याचा निर्धार यावेळी जिल्हाध्यक्ष संजय सावंत व कार्यवाह राजू जठार यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला यावेळी उपाध्यक्ष अवधूत शिरसाट व पुंडलिक दळवी, कार्यवाह राजू जठार, सहकार्यवाह राजन नाईक, कोषाध्यक्षपदी नंदन वेंगुर्लेकर, कार्यकारिणी सदस्य श्रीपाद चोडणकर, गणेश बोर्डेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, नंदकिशोर टोपले, सागर शिरसाट, श्रीराम शिरसाट, कुडाळ तालुकाध्यक्ष पी.डी.शिरसाट आदी उपस्थित होते.









