ठळक घडामोडी

कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण : ओंकार तेलींचा पुढाकार

कै. सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सेवेचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, संपूर्ण कुडाळ तालुक्यातील नागरिकांना ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहीती कूडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली.
    कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या पुढाकारातून त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम साकारण्यात येत आहे. मृतदेह वाहतुकीसाठी खाजगी वाहनांकडून आकारले जाणारे अवास्तव भाडे अनेकांसाठी परवडणारे नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय श्री.तेली यांनी घेतला आहे.
यापूर्वीही ओंकार तेली यांनी समाजसेवेच्या माध्यमातून वातानुकुलित शवपेटीची मोफत सेवा गेल्या आठ वर्षांपासून सुरू असून, समाजसेवेची परंपरा जपली जात आहे. कणकवली व सावंतवाडी येथे उपलब्ध असलेली वैकुंठ रथ सेवा आता कुडाळमध्येही सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, मृत व्यक्तीचा अंतिम प्रवास अधिक सन्मानाने पार पाडता येणार आहे.

error: Content is protected !!