समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले गावात ऐतिहासिक श्रमदान
महिलांचा मोठा सहभाग; 3 कि.मी. रस्त्याची केली स्वच्छता
कुडाळ : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या वतीने ‘प्रत्येक रविवार – गावासाठी’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रमदान मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच उपक्रमांतर्गत काल रविवारी (२८ डिसेंबर) आंदुर्ले ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व स्वयंसहायता समूहातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत आंदुर्ले खिंड ते मुणगी माईनवाडा हा या सुमारे 3 कि.मी. लांबीच्या मुख्य रस्त्याची स्वच्छता करून महा स्वच्छता अभियान राबविले.
या मोहिमेत आंदुर्ले व मुणगी महसुल गावातील जवळपास 300 हून अधिक महिलांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तीन तास श्रमदान केले. महिलांनी संपूर्ण रस्ता झाडून स्वच्छ केला तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या मोहिमेचे नियोजन संबंधित प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य व सी.आर.पी. यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, माजी सरपंच सौ. आरती पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत, अंजनी पाटकर, सुप्रिया येरम, स्मिता पिंगुळकर, प्रसाद सर्वेकर, सतिश राऊळ, अनुराधा साळगांवकर तसेच उमेद ग्रामसंघ पदाधिकारी, सीआरपी, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









