पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट घेत मागण्यांबाबत वेधले लक्ष
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा राज्य संघटनेचा इशारा
कुडाळ : प्रतिनिधी
समग्र शिक्षण अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत कायम करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. तरीही अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर राज्यातील सर्व समग्र शिक्षण कर्मचा-यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समग्र शिक्षा अभियानातील ३२ कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राज्य समग्र शिक्षा संघर्ष समितीने शासनाला दिला आहे.
दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत मागण्यांबाबत लक्ष वेधत, याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या राज्य संघटक वेदिका मांडकुलकर, उपाध्यक्ष विषयतज्ज्ञ हेमांगी जोशी, सचिन तांबे, राज्यसमन्वयक निलेश जाधव, सोनू कुडव, लक्ष्मीकांत मांजरेकर, गौरी नावेकर आदींनी उपस्थित राहून पालकमंत्री ना.राणे यांना मागण्यांबाबत निवेदन सादर केले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३२ कंत्राटी कर्मचारी नागपूर येथे यशवंत स्टेडियमवर सुरू असलेल्या आंदोलनात आपल्या मागणींसाठी सहभागी झाले आहेत, अशी माहीती जिल्हा संघर्ष समितीकडून देण्यात आली.
प्रथम नियुक्ती दिनांक पासून सेवा ग्राह्य धरून शासन सेवेत सरसकट समायोजन करा, या रास्त मागणीसाठी राज्यातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी पेटून उठले आहेत. त्यांनी नागपूर येथे एकवटत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आंदोलन सुरू करीत सरकारचे लक्ष वेधले. मात्र शासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. जर तातडीने सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास लहान मुलाबाळांसह आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या दरम्यान कुठलीही अघटित घटना घडल्यास त्याला राज्य शासन सर्वस्वी जबाबदार राहिल असा इशाराही, राज्य समग्र शिक्षा संघर्ष समितीने शासनाला दिला आहे.









