अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील मोदी सरकारने कामगारांनी संघर्षातून मिळवलेले हक्क काढून घेण्याच्या हेतूने कामगार कायदे रद्द करून चार श्रम संहिता तयार केल्या आहेत. या निर्णयाच्या विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत १२ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून, या संपात महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी होणार आहेत, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांनी कुडाळ येथे दिली.
कमलताई परूळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित असून, “आम्हाला कामगार माना व कामगार कायद्यांचे लाभ द्या” ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र केंद्र सरकारच्या श्रम संहितांमुळे हे हक्क नष्ट होण्याची भीती असून, त्याला तीव्र विरोध व्यक्त करण्यासाठी संपात सहभाग घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपश्चात पेन्शनबाबत कृती समिती व राज्य सरकारमध्ये एकमत झाले असतानाही ही योजना संघटनांना न दाखवता राबवली जात नसल्याने असंतोष वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. संघटनांशी कोणतीही चर्चा न करता कामाची वेळ वाढवणे, ऑनलाईन कामासोबत रजिस्टर लिहिण्याची सक्ती, मानधन व प्रोत्साहन भत्त्याबाबत एकतर्फी निर्णय, योजना-बाह्य कामांचा बोजा, इंधन दर अपुरा ठेवणे, थकीत देयके न देणे तसेच उन्हाळी सुट्टीबाबत सकारात्मक निर्णय न घेणे या सर्व बाबी निषेधार्ह असल्याचे परूळेकर यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एक दिवसाच्या संपात अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









