

राज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व

मालवण : प्रतिनिधी
राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित समजपूर्वक वाचन कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत शाळा कोळंब नं. १ च्या शिक्षिका सौ. मधुचंदा निखिल वस्त यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला. त्यांची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे) मार्फत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी समजपूर्वक वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका, विभाग व राज्य असे या स्पर्धेचे तीन स्तर होते. सौ. मधुचंदा निखिल वस्त यांनी समजपूर्वक वाचन स्पर्धेमध्ये मालवण तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती. सदर स्पर्धा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग येथे झाली. या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम आलेल्या शिक्षकांचा समावेश होता.
सौ. मधुचंदा वस्त यांच्या या यशाबद्दल मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, सौ. आरती कांबळी, सौ. नार्वेकर, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.









