ठळक घडामोडी

मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या ‘नेपोलियन’ गस्तीनौकेला जलसमाधी!

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ दुर्घटना; सर्व कर्मचारी सुखरूप

मालवण : प्रतिनिधी
     मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने पोलिसांच्या या गस्ती नौकेवरील सर्वांनी सुखरूप किनारा गाठला आहे.
    सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस नेपोलियन नावाची पोलिसांची गस्ती नौका गस्त घालत होती. सध्या सोसायट्याचा वारा सुरु झाला असून यामुळे अजस्त्र लाटा किनाऱ्याच्या दिशेने धावत आहेत. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अजस्त्र लाटांनी या गस्तीनौकेला धडका दिली त्यामुळे नौकेत पाणी शिरले. नौका बुडू लागल्याने नौकेवरील पोलीस तसेच खलाशी वर्गाने खबरदारीची उपाययोजना करीत आपला जीव वाचविला.
     दरम्यानच्या काळात मालवणच्या पोलिसांना या घटनेची माहिती त्यांनी योगेश तोडणकर यांच्या मालकीची नौका घेऊन समुद्राच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, नॉवेल फर्नांडिस, होमगार्ड जॉयल फर्नांडिस, खलाशी रॉनी, कुमार, लॉरेन्स, बेंडिट आदींनी पाण्यात बुडणाऱ्या नौकेला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले . हे प्रयत्न करीत असताना  त्यांनी जलसमाधी मिळालेल्या नौकेवरील दोघाजणांना वाचविण्यात यश मिळविले आहे. मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या नौकेला जलसमाधी मिळाल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ माजली आहे.

error: Content is protected !!