सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना दिलासा द्या; पंचनामे तात्काळ करण्याची मागणी
खराब हवामानाचा आंबा-काजू पिकांना फटका; शासनाने तुटपुंजी नव्हे तर भरघोस मदत द्यावी
कुडाळ : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे नयेत तर उर्वरित विधानसभा सत्रात चर्चा घडवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी लांबलेल्या पावसानंतर यंदाच्या थंडीतआंबा काजूला आलेल्या भरघोस मोहराने सुखावलेल्या बागायतदारांचा आनंद काही काळापुरताच ठरला. त्यानंतर खराब हवामानामुळे आंबा काजू व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात पुर्णपणे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून दिलासा मिळण्यासाठी कायम उपेक्षित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य प्रमाणात मदत मिळावी ही माफक अपेक्षा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री म्हणून ओळखले जातात, त्या मंत्री नितेश राणे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये या मुद्द्यांवर विशेष चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. खराब हवामानामुळे झालेले नुकसान हे फार मोठे आहे, कारण बागायतदार यांच्या मार्फत आंबा काजू हे फळ टिकवण्यासाठी विविध महागडी औषधे फवारणी करून शर्थीचे प्रयत्न केले गेले आहेत. यामध्ये सद्यस्थितीत आंबा तसेच काजू बागेच्या निगा राखण्यासाठीचा झालेला खर्च सुद्धा राहिलेल्या पिकातून निघण्याची आशा सुद्धा राहिलेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा प्रशासनाला झालेल्या आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शासनाकडून या झालेल्या नुकसानीवर अधिवेशनाच्या या सत्रामध्ये तुटपुंजी नको तर भरघोस अशी नुकसान भरपाई जाहीर करून घेण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.









