ठळक घडामोडी

मालवणात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; जि.प.–पं.स.च्या सर्व जागांवर दणदणीत विजय!

विजयानंतर मालवणात कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

मालवण : महेश कदम
      मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या अकरा जागांवर महायुतीचाच “बोलबाला” दिसून आला. महायुतीच्या उमेदवारांनी जि.प आणि पंचायत समितीच्या सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व राखले. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला एकाही जागेवर खाते खोलता आले नाही.
     तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समितीच्या जागांसाठी ७ तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडली. यानंतर आजच्या मतमोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. आज कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चव्हाण, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. सुरवातीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पोवार यांनी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना गोपनीयतेची शपथ दिली.
      पहिल्यांदा आडवली मालडी जिल्हा परिषद गट तसेच शिरवंडे पंचायत समिती गणाची मतमोजणी पार पडली. यात शिवसेनेच्या सोनाली घाडीगांवकर यांनी ४०५५ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या माधुरी सावंत यांचा ७२३ मतांनी पराभव केला. शिरवंडे मधून शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांनी २०५१ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या युवराज मेस्त्री यांचा ४४७ मतांनी विजय मिळविला. आचरा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या वर्षा सांबारी यांनी ३६०४ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या संजना रेडकर यांचा १६६ मतांनी पराभव केला. चिंदर पंचायत समिती गणातून भाजपच्या दीपक सुर्वे यांनी १४४५ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या समीर लब्दे यांचा ३१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. आचरा पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या गणेश तोंडवळकर यांनी २१४७ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या लवू मालंडकर यांचा ६६१ मतांनी पराभव करत विजय मिळविला.
मसुरे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या क्षमा हडकर यांनी ३४२२ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या आनंदी परब यांचा ५३२ मतांनी पराभव करत विजय मिळविला. कोळंब पंचायत समिती गणातून भाजपच्या योजना कांबळी यांनी १७५७ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या पूजा गवंडी यांचा ५६७ मतांनी पराभव करत विजय मिळविला. मसुरे मर्डे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या संजय ठाकूर यांनी १८३४ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या वैभव चव्हाण यांचा ३२३ मतांनी पराभव करत विजय मिळविला.
सुकळवाड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या सुमेधा पाताडे यांनी २७४५ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या पूजा चव्हाण यांचा १८६५ मतांनी पराभव करत विजय मिळविला. पोईप पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या प्रज्ञा चव्हाण यांनी २५३६ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या प्राजक्ता परब यांचा १५४९ मतांनी पराभव करत विजय मिळविला. सुकळवाड पंचायत समिती गणातून भाजपच्या संतोष गावडे यांनी १४५१ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या प्रणय मयेकर यांचा १७२ मतांनी पराभव करत विजय मिळविला.
पेंडूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या संतोष साटविलकर यांनी ४४०६ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या घनश्याम राणे यांचा १४४१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. वराड पंचायत समिती गणातून भाजपच्या माधुरी मसुरकर यांनी १९६१ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या दीक्षा रेवडेकर यांचा ४११ मतांनी पराभव करत विजय मिळविला. पेंडूर पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या रिया बावकर यांनी २३११ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या सप्तशिला धामापूरकर यांचा ८२३ मतांनी पराभव करत विजय मिळविला.
वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गटातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अक्षता गावडे यांनी ४२२२ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या साक्षी लुडबे यांचा ११८१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. कुंभारमाठ पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या मानसी भोगावकर यांनी २५३४ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या प्रणिता लंगोटे यांचा १५२७ मतांनी पराभव करत विजय मिळविला. वायरी भूतनाथ पंचायत समिती गणातून भाजपच्या घनश्याम झाड यांनी १७६५ मते मिळवीत ठाकरे शिवसेनेच्या पास्कोल रॉड्रिग्ज यांचा १९६ मतांनी पराभव करत विजय मिळविला. विजयानंतर शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशद्वाराबाहेर महायुतीच्या उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत मोठा जल्लोष केला.

error: Content is protected !!