ठळक घडामोडी

कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत!

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

रात्री पावशी येथे मुक्काम; उद्या वेताळबांबर्डेत पालखी व पादुकांचे आगमन

कुडाळ : प्रतिनिधी
       अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळ शहरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. कुडाळ औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते पोस्ट ऑफिस चौक, बाजारपेठ मार्गे महालक्ष्मी हॉल पर्यंत ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरात श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी भक्तांनी श्रींच्या पादूका व पालखीचे दर्शन घेतले. संपूर्ण शहर ‘श्री स्वामी समर्थ’ नामघोषाने दुमदुमून गेले होते.
        या पालखी व पादुकांचे कुडाळ औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आगमन झाल्यानंतर तेथे पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दर्शन सोहळ्याला सुरवात झाली. नंतर तेथून ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकभक्तांनी ठिकठिकाणी श्रींचे दर्शन घेतले. नंतर कुडाळहून पावशीच्या दिशेने पालखी पुढील परिक्रमेला मार्गस्थ झाली. रात्री आठ वाजता पावशी येथे विनायक केसरकर यांच्या निवासस्थानी पालखी व पादुकांचे आगमन होणार असून तेथे पालखी व पादूकांचा दर्शन सोहळा तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
      शनिवारी वेताळबांबर्डेत पालखी व पादुकांचे आगमन!
      श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावात वासुदेव (बाळा) गावडे यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहे. ९.१५ वाजता महाराजांची पालखी व पादुकांची मिरवणूक, महाराजांची पालखी व पादुकांचे वेताळबांबर्डे पावणाईटेंब- दारवळवाडी येथील वासुदेव (बाळा) गावडे यांच्या निवासस्थानी आगमन होईल. ९.३० वाजता महाराजांची पालखी व पादुकांच्या दर्शनाला प्रारंभ होईल. ११ वाजता महाराजांची महाआरती, ११.३० वाजता महाप्रसाद, दुपारी १ वाजता महाराजांच्या नामाचा जप, सायंकाळी ४ वा. पालखी व पादुका पुढील परिक्रमेला मार्गस्थ होणार आहेत. पालखी व पादुका सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पर्यंत श्री. गावडे यांच्या निवासस्थानी असणार आहेत. भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळा गावडे व परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!