विषय समित्यांच्या निवडीला ब्रेक
गटनेत्यांनी सदस्यांची नावेच न दिल्याने निवडणूक प्रक्रिया फसली
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विषय समिती सभापती पदासह महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी आज प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवड प्रक्रियेकडे नगरसेवकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र ऐनवेळी निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे ही संपूर्ण निवड प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात आले.
निवडणुकीनुसार सर्व नगरसेवक सकाळी कुडाळ नगरपंचायतीत उपस्थित झाले होते. समित्यांची स्थापना होऊन पदवाटपावर शिक्कामोर्तब होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटनेत्यांनी समिती स्थापनेसाठी आवश्यक असलेली आपापल्या नगरसेवकांची नावेच प्रशासनाकडे सादर केली नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने नियोजित निवडणूक प्रक्रिया राबविणे प्रशासनाला शक्य झाले नाही. गटनेत्यांच्या नावांवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दोन्ही बाजूंमध्ये अंतर्गत राजकीय रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा नगरपंचायत वर्तुळात रंगली आहे. या राजकीय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासन पुढील निर्णय काय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.







