विकास, जनसेवा आणि एकजूट; पिंगुळीत महायुतीचा जोरदार प्रचार

कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार अजय सत्यवान आकेरकर यांनी प्रचाराची धुरा हाती घेत निवडणूक रिंगणात जोमाने प्रवेश केला आहे. विकास, जनसेवा आणि एकजुटीच्या बळावर पिंगुळी जि.प. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच आपले एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
पिंगुळी जि.प. उमेदवार अजय आकेरकर यांच्यासह पंचायत समिती उमेदवार साधना माडये व साळगावचे उमेदवार मिलिंद नाईक यांच्या प्रचारासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. गावोगावी प्रचारफेऱ्या, बैठका, जनतेशी थेट संवाद आणि वचननामा घरोघरी पोहोचवण्यावर भर देत प्रचारात चांगलाच वेग आला आहे. या प्रचाराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान बोलताना अजय आकेरकर म्हणाले,
विकास आणि जनसेवा हाच महायुतीचा केंद्रबिंदू आहे. पिंगुळी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेली महायुती जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सक्षम झाली, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट कसा होतो, हे निश्चितपणे दाखवून दिले जाईल.
खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्ह्यात राबविलेल्या विकासकामांचा दाखला देत, महायुतीच्या सत्तेचा थेट लाभ स्थानिक पातळीवर मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंगुळी मतदारसंघात आजही दर्जेदार रस्ते, सार्वजनिक प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रे, संगणकीकृत व मराठी भाषा जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, क्रीडांगणे, उद्याने, आधुनिक वाचनालये तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची नितांत गरज आहे. केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस निधी आणून या सर्व विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्धार महायुतीच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या प्रचाराला मतदारसंघात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सुजाण मतदारांच्या एकजुटीच्या बळावर पिंगुळी मतदारसंघात महायुतीचा भक्कम विजय निश्चित असल्याचा विश्वास अजय आकेरकर यांनी व्यक्त केला आहे.







