रणजित देसाईंच्या पोस्टची चर्चा!!
कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर कुडाळ – पिंगुळी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी काल आपल्या व्हाॅटसअप सोशल मीडियावर व्यक्त केलेला स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अर्थपूर्ण शब्दांतून मांडलेल्या या स्टेटसमुळे विविध तर्कांना उधाण आले असून, त्यातून पुढील राजकीय हालचालींचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शांत, संयमी आणि कमी बोलून अधिक काम करणारे नेतृत्व अशी ओळख असलेले रणजित देसाई हे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. राणे यांच्यासोबत राहून त्यांनी संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम केले असून पक्षासाठी निष्ठेने योगदान दिले आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना देसाई यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवामुळे शेतकरी व कृषी क्षेत्राला चालना मिळाली होती. या उपक्रमातून त्यांनी विकासाभिमुख आणि कार्यकेंद्रित नेतृत्वाची वेगळी छबी निर्माण केली होती. राजकीय संघर्षांमध्येही संयम न सोडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे.
मतदानानंतरच्या या स्टेटसचा नेमका अर्थ काय, तो कोणत्या संदर्भात आहे आणि पुढील राजकीय हालचालींचे संकेत त्यातून मिळतात का, याबाबत त्यांनी मौन बाळगले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला वेग आला आहे. शांतपणे योग्य वेळेची वाट पाहणारे रणजित देसाई पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.









