ठळक घडामोडी

सावंतवाडीत लवकरच धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे ओपीडी केंद्र सुरू होणार!

सावंतवाडी : प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गोवा राज्यातील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान (AIIA) चे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) लवकरच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेद उपचारांसाठी गोव्याला जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचणार असून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे.

    या केंद्राच्या स्थापनेसाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच तसा प्रस्ताव मंजूर होऊन दिल्लीतील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक आमदार प्रतिनिधी आणि उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. देव्या सुर्याजी यांनी आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते.

   नुकत्याच झालेल्या बैठकीत अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे संचालक डॉ. प्रजापती यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे केंद्र सावंतवाडीत युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये लवकरात लवकर सर्व आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करून कायदेशीर करार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

   आयुष रुग्णालयाच्या या नवीन ओपीडी सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार आणि मोफत आयुर्वेद उपचार उपलब्ध होणार आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी डॉ. प्रजापती यांनी सांगितले. या बैठकीला डॉ. सुजाता कदम, डॉ. विनायक चकोर आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!