

केवळ डॉक्टर नाही, तर अख्ख्या दुकानवाड पंचक्रोशीचा “आधारस्तंभ”

दुकानवाड : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणच्या भूमीला थोर समाजसुधारकांची आणि सेवाव्रतींची मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक आधुनिक नाव म्हणजे डॉ. संजीव राजाराम गवंडे. माणगांव खोऱ्यातील दुकानवाड (ता. कुडाळ) पंचक्रोशी ज्यांना प्रेमाने ‘डॉक्टर काका’ म्हणून हाक मारते, त्या देवमाणसाचा बुधवार दि.१ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीचा नसून, एका अखंड ३२ वर्षांच्या निस्पृह सेवेचा, समर्पणाचा आणि माणुसकीच्या अथांग श्रीमंतीचा उत्सव आहे. त्यांच्याच प्रवासाचा घेतलेला थोडक्यात आढावा…
शहराचे ग्लॅमर नाकारून गावाकडे पाऊल
डॉक्टर काकांचा प्रवास सुरू झाला तो एका जिद्दीतून. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयातून बी.ए.एम्.एस्. पदवी शिक्षण पूर्ण करून नंतर मुंबईतील नामांकित वाडिया हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्त्रीरोग आणि बालरोग या विषयांत उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतले. मुंबईसारख्या शहरात राहून स्वतःची प्रॅक्टिस थाटणे, नाव आणि पैसा मिळवणे त्यांच्यासाठी सोपे होते. मात्र, त्यांचे मन आपल्या मातीच्या ओढीने व्याकुळ होते. इंजिनिअर संभाजी पाटील यांच्या आग्रहाखातर ते केवळ काही दिवसांसाठी दुकानवाड भागात आले होते. पण जेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली, तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून निघाले.त्याकाळी रस्ते नव्हते, विजेचा पत्ता नव्हता, दळणवळणाची साधने शून्य होती. आजारी रुग्णाला दवाखान्यापर्यंत न्यायचे असेल तर झोळीचा किंवा पाळण्याचा आधार घ्यावा लागायचा. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट असायची. ही आव्हानात्मक परिस्थिती पाहून डॉक्टर काकांनी निर्णय घेतला की, आपल्या ज्ञानाची खरी गरज इथल्या गरिबांना आहे आणि त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचे ठरवले. अंगावर शहारे आणणारा तो प्रसंग डॉक्टर काकांच्या या ३२ वर्षांच्या प्रवासात अनेक प्रसंग आले, पण आंजिवडे गवळीवाडीतील एका प्रसंगाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. एका चिमुकल्या बाळाची प्रकृती खालावली होती. त्याला वाचवण्यासाठी काकांनी त्याला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि तब्बल ७-८ किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. तिथून बसने त्याला सावंतवाडीला नेले, पण दुर्दैवाने तो जीव वाचू शकला नाही. त्या रात्री काका खूप रडले. त्या एका घटनेने त्यांना जाणीव करून दिली की, दुर्गम भागात वेळेवर उपचार मिळणे किती गरजेचे आहे. तेव्हापासून त्यांनी ठरवले की, काहीही झाले तरी या लोकांसाठी मी २४ तास उपलब्ध राहीन.
दवाखाना नाही, तर ते एक मंदिर होते
दुकानवाड येथील त्यांचा दवाखाना म्हणजे एक मातीची छोटी खोली. पण त्या खोलीत शिरणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तिथे डॉक्टर नाही, तर एक आधार दिसायचा. पहाटे साडेसहा वाजता काकांचा दवाखाना सुरू व्हायचा. गावकरी पहाटेपासूनच तिथे नंबर लावून बसलेले असायचे. काका स्वतः दवाखान्याचे अंगण झाडून काढायचे, पिण्यासाठी ताजे पाणी ठेवायचे. या साध्या वागण्यातूनच त्यांनी लोकांची मने जिंकली.काकांकडे रुग्ण केवळ गोळ्या,औषधे घ्यायला यायचे नाहीत, तर त्यांच्याशी चार सुख,दुखाच्या गोष्टी करायला यायचे. ग्रामीण भागातील बायका, वृद्ध लोक काकांकडे येताना घरचे ताजे दूध, भाजी, तांदूळ, केळी किंवा शहाळी घेऊन यायचे. ही त्यांची फी असायची. प्रेमाने दिलेला एक नारळ किंवा भाजीची पेंडी ही काकांसाठी हजारो रुपयांच्या फी पेक्षा मोठी होती.
३२ वर्षांची अखंड सेवा…..
आज दुकानवाड पंचक्रोशीत असं एकही घर नाही, जिथे डॉक्टर काकांचं नाव माहीत नाही. तीन पिढ्यांवर त्यांनी उपचार केले आहेत. ज्यांना त्यांनी लहानपणी कडेवर घेऊन उपचार केले, आज ती मुले मोठी होऊन सैन्यात भरती झाली आहेत किंवा परदेशात नोकरी करत आहेत. पण आजही ती मुले जेव्हा गावी येतात, तेव्हा सर्वात आधी डॉक्टर काकांना भेटायला जातात. परदेशातून आणलेला एखादा पदार्थ किंवा स्वतःच्या हाताने बनवलेले मोदक काकांसाठी घेऊन येतात. हीच त्यांची खरी कमाई आहे.
कुटुंबाचा भक्कल आधार
डॉक्टर काकांच्या या यशस्वी आणि सेवाभावी प्रवासामागे त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे. त्यांचे वडील राजाराम गवंडे (मलेरिया सुपरवायझर) आणि आई रोहिणी गवंडे (निवृत्त मुख्याध्यापिका) यांनी त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार केले. त्यांची पत्नी सौ. शिवानी गवंडे, ज्या स्वतः गडहिंग्लज केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी डॉक्टर काकांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांना साथ दिली. मुलगा अभिषेक ऑस्ट्रेलियात संशोधक म्हणून कार्यरत असूनही आपल्या वडिलांच्या कामाचा त्याला सार्थ अभिमान आहे. बहीण प्रज्ञा आचरेकर याही शिक्षण क्षेत्रातून समाजाची सेवा करत आहेत.
माणुसकीची श्रीमंती
आजच्या युगात जिथे वैद्यकीय क्षेत्र हे व्यवसायाकडे झुकले आहे, तिथे डॉक्टर काकांसारखी व्यक्ती एक आदर्श दीपस्तंभ आहे. एकदा काकांचा पाय फॅक्चर झाला होता, तरीही लोक त्यांच्या भेटीसाठी गर्दी करत होते. कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होते, बस सेवा ठप्प होती, तेव्हा लोक स्वतःच्या वाहनाने काकांपर्यंत पोहोचत होते. हा विश्वास त्यांनी ३२ वर्षे कष्ट उपसून कमावला आहे.काका नेहमी म्हणतात, “मिळकत शून्य असली तरी आशीर्वाद खूप मिळाले.” स्थानिकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने काकांना दवाखान्याची नवीन वास्तू बांधून दिली, ही घटना त्यांच्या कार्याचा केवढा मोठा सन्मान आहे याची प्रचिती देते.
दुकानवाड पंचक्रोशीच्या या ‘देवमाणसाला’ उदंड आयुष्य लाभो. डॉक्टर काका, तुमचे हे माणुसकीचे झाड असेच बहरत राहो आणि तुमच्या रूपाने सेवेचा हा नंदादीप अखंड तेवत राहो, हीच आजच्या दिवशी ग्रामदेवता श्री देव जटाशंकर चरणी प्रार्थना!









