
टाकाऊ जाळ्यात अडकलेल्या माशांची स्कुबा टीमकडून सुटका
समुद्र स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी – स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले
मालवण : महेश कदम
तारकर्ली बंदर जेट्टी येथून निवती लाईटहाऊस येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जाणाऱ्या राजेंद्र तारी यांच्या तारकर्ली डायव्हर्स टीमला निवती लाईटहाऊस परिसरात सुमारे ६०० ते ७०० किलो वजनाचे घोस्ट नेट (टाकाऊ जाळे) आढळून आले. समुद्री जीवांसाठी घातक ठरणाऱ्या या जाळ्यात अडकलेल्या जिवंत माशांची सुटका करून ते जाळे बोटीत घेऊन समुद्रकिनारी आणण्यात आले.
या मोहिमेत तापोळा (जि. सातारा) येथून स्कुबा डायव्हिंगसाठी आलेले डाईव्ह मास्टर तेजस भोसले, आर्यन धनावडे, अमित पडगे व त्यांचे मित्रमंडळी, तसेच खवणे कयाकचे रोहन परब यांनी सहभाग घेतला. बोट चालक गजानन तोरसकर व नाना तोरसकर यांच्यासह स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले, डाईव्ह मास्टर सुमित पराडकर, सूरज खवणेकर, साहिल मेथर, मयुर बघेले आदींनीही घोस्ट नेट काढण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
समुद्र मानवाला मासे, मीठ, मोती यांसारख्या मौल्यवान गोष्टी देतो. पर्यटन, मासेमारी व व्यापार यांसाठी समुद्र महत्त्वाचा असून पृथ्वीवरील ५० टक्क्यांहून अधिक प्राणवायू देण्यामध्येही समुद्राचा मोठा वाटा आहे. सध्या निवती लाईटहाऊस परिसर हा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत असल्याने समुद्र व समुद्रतळ स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले यांनी सांगितले. यापूर्वीही अशाच प्रकारे घोस्ट नेटमधून समुद्री कासव व माशांना जीवदान देण्याचे काम केले असून प्रत्येक डायव्हमध्ये शक्य तितका कचरा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सर्वांनी मिळून समुद्राची काळजी घेतली पाहिजे, असे स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले यांनी सांगितले.








