ठळक घडामोडी

जि. प. प्राथ. शाळा कवठी नं. १ ‘जेट टॉय’ स्पर्धेत अव्वल!

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

ग्रामीण विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती व कल्पकतेचा ठसा

कुडाळ : प्रतिनिधी
     SAE India आणि Mahindra & Mahindra यांच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित ‘जेट टॉय’ स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं. १ या प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावत ओव्हरऑल विजेतेपद मिळवले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
     दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नेरुरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे दिवसभर झालेल्या या अनोख्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी परिसरातील हायस्कूल व इंग्रजी माध्यम शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत कवठीच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण, वजन वहन क्षमता, अचूकता आणि अंतर अशा चार फेऱ्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले.
       या स्पर्धेत कुमार हर्ष अनिल वाडयेकर, कुमारी सौम्या रामचंद्र करलकर, कुमार मिहीर प्रफुल वाडयेकर आणि कुमारी स्वरा सुभाष जोशी यांनी सहभाग घेतला. त्यांच्या या यशामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी झाली असून कवठी गाव परिसरातून विजेत्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्पर्धेसाठी महिंद्रा कंपनीचे सुबोध मोरये यांच्या मार्गदर्शनाखाली समीर वंजारे, समीर माडये व संजय मालप यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका प्रीती नारकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री. परब, पदवीधर शिक्षिका श्रीमती सावंत आणि पदवीधर शिक्षक श्री. पालवे यांचेही सहकार्य लाभले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीष वाडयेकर, उपाध्यक्ष श्रीमती जोशी, सरपंच सौ. स्वाती करलकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी तांबे, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. परब व श्रीमती नारकर यांनी महिंद्रा कंपनीचे आभार मानले.
     व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत महिंद्राने आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना समान साहित्य देऊन जेट टॉय तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. तयार प्रकल्पांचे अधिकतम क्षमता, अंतर पार करणे, वजन वाहून नेणे, ठरलेल्या ठिकाणी थांबणे, अधिक वेळ व जलद गतीने चालणे तसेच भविष्यातील अभियांत्रिकी आव्हानांचे सादरीकरण या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. महिंद्राच्या संपूर्ण पथकाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

error: Content is protected !!