ठळक घडामोडी

देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात एन.एस.एस.चा मोलाचा वाटा – साईनाथ चव्हाण

साळेल येथे स.का. पाटील महाविद्यालयाचे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर

मालवण : प्रतिनिधी
     देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)चा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमदानाची सवय, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्यावर उपाययोजना शोधण्याची जाणीव निर्माण होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधत त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण देण्याचे महत्त्वाचे कार्य एन.एस.एस. करते, असे प्रतिपादन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी केले.
      ते स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्या एन.एस.एस. विभागाच्या सातदिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हे शिबिर साळेल गावात संपन्न झाले. यावेळी साईनाथ चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील एन.एस.एस.चे अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी साळेल गावचे सरपंच रवींद्र गावडे होते. त्यांनी शिबिरासाठी शुभेच्छा देत आवश्यक ते सर्व सहकार्य ग्रामपंचायतीच्या वतीने दिले जाईल, असे आश्वासन दिले. मालवण तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य कमलाकर गावडे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याचे आवाहन केले. आयुष्यात सर्वच गोष्टी मनासारख्या मिळत नाहीत, मात्र अशा परिस्थितीतही मार्ग काढत पुढे जाण्याची शिकवण एन.एस.एस. देते, असे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या सात दिवसांत एन.एस.एस. स्वयंसेवकांचे पालकत्व गावाच्या वतीने स्वीकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी एन.एस.एस.च्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर उपसरपंच लक्ष्मण परब, संचालक संदेश कोयंडे, एन.एस.एस. समन्वयक डॉ. देविदास हारगिले, ग्रामसेविका स्वरा परब, पोलिस पाटील रवींद्र गावडे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गावडे, संपदा गावडे उपस्थित होते. तसेच डॉ. उज्ज्वला सामंत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. हसन खान, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. रामचंद्र तावडे, सूर्यकांत कदम, विद्यार्थी सचिव सर्वेश राणे, उद्योजक अरविंद तावडे, वसंत पडवळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी नरेश गावडे, राजाराम गावडे, मुरारी गावडे, रोशन गावडे, वैभव गावडे, चिन्मय तावडे व इतर ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. समन्वयक डॉ. देविदास हारगिले यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रमोद खरात यांनी तर आभारप्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संकेत बेळेकर यांनी केले.

error: Content is protected !!