ठळक घडामोडी

कुडाळमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम!

९ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सन्मान सोहळा

आ.निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला आघाडीचे आयोजन – सौ.दीपलक्ष्मी पडते यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
       ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे महिलांसाठी विविध उपक्रमांनी भरलेला “जागर स्त्री शक्तीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सोमवार, दि. ९ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. कुडाळ पोस्ट ऑफिसजवळील श्री सिंधुदुर्गचा राजा मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा तसेच आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली आहे, अशी माहीती शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्या सौ.दीपलक्ष्मी पडते यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
        कुडाळ येथील महायुती संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ.पडते बोलत होत्या. यावेळी नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, रेवती राणे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
        कार्यक्रमाबाबत माहीती देताना सौ.पडते म्हणाल्या, या कार्यक्रमाचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार असून आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मालवण नगराध्यक्षा सौ.ममता वराडकर आदींसह विविध
मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणून महिला ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण होणार आहे. तसेच महिलांसाठी पाककला स्पर्धा (खाद्यपदार्थ नाचणी, पाककलेची कृती लिहून आणणे आवश्यक), उखाणे स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. निमंत्रित ग्रुप डान्सचा नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. तसेच “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातील प्रथम क्रमांकाला पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकाला चांदीचा करंडा अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित सर्व महिलांना सौभाग्यवान भेट देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात खाऊगल्लीत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच शॉपिंग स्टॉल देखील उभारण्यात येणार आहेत. रात्री आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ देखील आयोजित करण्यात आला असून मिक्सर, पंखा, इलेक्ट्रिक केटल, कढई आदी घरगुती वस्तू बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. पाककला स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी रेवती राणे मो.नं. ९४२२३७९६१२ व रेखा काणेकर मो.नं. ९७६५२३११४३ आणि उखाणा स्पर्धेसाठी चांदणी कांबळी मो.नं. ९९२१०५६४१९ व श्रुती वर्दम मो.नं. ९४२११४५०४१ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते यांनी केले आहे. यावेळी शिवसेना जि.प.सदस्य दादा साईल, शहरप्रमुख अभी गावडे, चेतन पडते, राकेश कांदे, रिया गडेकर, जान्हवी कदम, दिपाली कानसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!