मालवण : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूक लढवित आहोत. महायुतीत बंडखोरी होणार नाही असा ठाम विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त करतानाच या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा आशावादही श्री.सामंत यांनी व्यक्त केला.
मालवण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक उमेश नेरुरकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, राजा गावकर, शेखर गाड, राजन माणगावकर, राजू बिडये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना श्री. सामंत म्हणाले पंचायत समिती – जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुका भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणून निवडणुक रिंगणात उतरली आहे आणि ही महायुती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपर्क मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुका लढविल्या जात आहेत. या निवडणुकीत महायुती चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त जागा जिंकणार असून सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यावर महायुतीचा झेंडा फडकेल आणि महाराष्ट्रात आम्ही नवा इतिहास निर्माण करू असे सांगून ते म्हणाले आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत असे असताना जर एखाद्या वेळेस बंडखोरी झाली तर ती थांबविण्याची ताकद आमच्या महायूतीच्या नेत्यांकडे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे असे वाटत असते मात्र एकालाच कोणाला तरी उमेदवारी मिळते त्यामुळे पक्षनिष्ठा आणि नेत्यांवर श्रद्धा असणारे लोक या निवडणुकीत पक्षाच्या नेतेमंडळींनी सांगितल्यानंतर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील असे ते म्हणाले.









