ठळक घडामोडी

कणकवली जवळील हुंबरट तिठा येथे अपघात; युवकाचा मृत्यू

कणकवली : प्रतिनिधी

     गोव्याहून-मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणा-या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमान अब्दूल गणी खतीब (२२, रा. राजापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालक हरिष पाटील (५२ रा. राधानगरी, कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत अधिक वृत्त असे की, अमान खतीब हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. हुंबरट तिठा दरम्यान महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या दिशेने जात असलेल्या चिरेवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात ट्रकला मागाहून दुचाकीस्वार अमान याने जोरदार धडक दिली. या धडकेत अमन याच्या डोक्यासह अन्य ठिकाणी दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी  मदतकार्य करत अमन याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घन:श्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह पोलीस दाखल झाले होते. अमन याच्या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी काही वेळानंतर उपजिल्हा रुग्णालय दाखल झाले. मात्र, अपघातात अमनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमानच्या गावातील मंडळी व त्याचे मित्र देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबत बाबू गोविंद गुरव (रा. हुंबरट, वरचीगुरववाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हरिष पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी गणी खतीब यांचा अमन हा पुत्र तर राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमन हा पुतण्या होत.

error: Content is protected !!