

मालवण : प्रतिनिधी
मालवण शहरातील दांडी दूधवडकरवाडा येथील सागर श्यामसुंदर भगत (वय ३२) या विवाहित तरुणाने आज राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दांडी दूधवडकरवाडा येथील रहिवासी असलेला सागर भगत हा त्याची पत्नी, लहान मुलगी व आई वडील यांच्यासह राहत होता. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भगत कुटुंबीय घरात जेवण करत असताना सागर याला जेवणासाठी बोलवण्यासाठी त्याची पत्नी खोलीकडे गेली असता सागर हा खोलीत छप्परच्या मधल्या लाकडी खांबाला दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. हे दृश्य पाहून पत्नीने टाहो फोडत आरडाओरडा केला असता भगत कुटुंबीय व शेजाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. याबाबत मालवण पोलीसांना माहिती दिल्यावर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांकडून पंचनामा करण्यात आला. सायंकाळी सागर याचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. याबाबत त्याचे काका संतोष भगत यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सागर याच्या पश्चात पत्नी, सात महिन्यांची मुलगी, आई, वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.









