

मुंबईत मोफत घरे मिळण्याची मागणी – काॅ.विजय कुलकर्णी
सिंधुदुर्गातील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, कुडाळात मेळाव्याला प्रतिसाद
कुडाळ : प्रतिनिधी
गिरणी कामगारांच्या लढ्याला वीस वर्षाचा इतिहास आहे हाच इतिहास आपण संघटितपणे लढल्यामुळेच यश मिळत आहे. भविष्यातही हे यश मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणूनच येत्या 10 मार्चला गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईत घरे देण्यास राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य मोर्चात सिंधुदुर्गातील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन गिरणी कामगारांचे नेते कॉ.विजय कुलकर्णी यांनी कुडाळ येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात केले.
सर्व श्रमिक संघटना (गिरणी कामगार विभाग कोंकण) यांच्या वतीने गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजे यासाठी तसेच विविध विषयावर चर्चा करण्यासाठी गिरणी कामगारांचा मेळावा आज कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या सभागृहात गिरणी कामगारांचे नेते कॉम्रेड विजय कुलकर्णी, कॉ.अतुल दिघे, कॉ. बी. के. आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल. यावेळी गिरणी कामगार कोकण नेते कॉ.शांताराम परब, संतोष मोरे, सुनील निचम संतोष चव्हाण आनंद भोगन, दीपक परब यांच्यासह गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होता .
यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले सर्व श्रमिक संघटना गेले वीस वर्षे गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देत आहेत लालबावटा विचारावर ही संघटना वाटचाल करत असून या संघटनेच्या यशासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करणार आहोत गिरणी कामगारांनी न्याय्य हक्कासाठी लढून ८२ मध्ये संप केला सातत्याने हा लढा सुरू आहे आमच्या गिरणी कामगारांना व त्यांच्या वारसदारांना ही मुंबईतच घरे दिली पाहिजे हे या सरकारला भाग पाडण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात येत्या दहा मार्चला गिरणी कामगार व वारसांचा प्रचंड मोर्चा आझाद मैदानावर सकाळी अकरा वाजता होणार आहे या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद सरकारला दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले मालकावर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर ही आमची रास्त मागणी आहे हा लढा लढतानाच शेतकरी कामगार विरोधी जे कायदे आहेत त्यासाठी सुद्धा आमचा लढा असणार असल्याचे त्यांनी सांगितले
श्री. आंब्रे म्हणाले गेली 20 वर्षे आपण देत असलेल्या संघर्षामुळे यश मिळत आहे. अनेक मोर्चे काढले याबाबत सर्वांनाच त्रास होतो, मात्र तो त्रास सहन केल्याशिवाय आपण यश मिळवू शकत नाही राज्य शासनाचा शेलू वांगणीला घरे देण्याचा जो डाव आहे तो डाव आपण येत्या दहा मार्चला भव्य मोर्चाने हाणून पाडला पाहिजे शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही राज्यात सत्ता कोणाची येवो आमचा लढा हा न्याय्य हक्कासाठी असणार आहे असे सांगितले
संतोष मोरे यांनी मोफत घर मागणी मुंबईतच मिळाली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे यासाठी संघर्ष अटळ आहे ज्यांना लॉटरी पद्धतीने घरे लागली त्यांनीसुद्धा या मोर्चात सामील झाले पाहिजे वारसदार मोठ्या संख्येने सामील झाले पाहिजेत असे आवाहन केले कॉम्रेड अतुल दिघे यांनी सुद्धा गिरणी कामगारांना आपले हक्क काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्व श्रमिक संघटनेचे नेते शांताराम परब यांनी केले









