१५ जानेवारीपर्यंत रक्कम न मिळाल्यास जि. प. सीईओ दालनासमोर ठिय्या आंदोलन
ठाकरे शिवसेनेचे कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगेंचा इशारा
कुडाळ : प्रतिनिधी
हुमरमळा (वालावल) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा कामे ठेकेदारांना पैसे न मिळाल्याने अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ–मालवण विधानसभा संपर्क प्रमुख अतुल बंगे यांनी केला आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत अडकलेली रक्कम न मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर केव्हाही ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बंगे म्हणाले, जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे जोरात सुरू झाली; मात्र हुमरमळा (वालावल) येथील कामे गाजावाजा करून सुरू झाली असली तरी अनेक सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले आहेत. काही ठेकेदारांनी मौल्यवान वस्तू गहाण ठेवून साहित्य व कामगारांचे पैसे दिले, तर काहींनी कर्ज काढून कामे पूर्ण केली. त्यामुळे अनेक ठेकेदारांवर आर्थिक संकट ओढावले असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. शासन आज–उद्या पैसे देईल या आशेवर ठेकेदार असले तरी प्रत्यक्षात देयके अदा होत नसल्याने संताप वाढत आहे. ग्रामस्थांना पाणी मिळालेले नाही आणि ठेकेदारांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे, अन्यथा १५ जानेवारीनंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा अतुल बंगे यांनी दिला आहे.









