सर्वपक्षीयांनी केली रंगपंचमी साजरी; तरुणाईसह अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरात मंगळवारी शहरवासीयांनी सप्तरंगांची उधळण करत मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. सोमवारपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. गावागावतही रंगपंचमीचा आनंद लुटण्यात आला.
कुडाळ शहरातील विविध भागांत डिजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. रंगांची उधळण, पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये आनंदोत्सव आणि “होळी है”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. तरुणांसह अबालवृद्धांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला. दुपारपर्यंत शहरात रंगपंचमीचा जल्लोष सुरू होता. शहरातील जिजामाता चौक आणि बाजारपेठ परिसरात सर्वपक्षीय पदाधिकारी व युवावर्ग एकत्र येत रंगपंचमी साजरी करण्यात आली. दिड दिवस चाललेल्या शिमगोत्सवाची रंगपंचमी व धुळवडीने दुपारी सांगता झाली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.







