चुरशीच्या अंतिम सामन्यात गुढीपूर संघ विजेता, पाट संघ उपविजेता
क्रिकेट स्पर्धेसह खेळाडूंना विविध वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मान
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सुनील स्पेअर्स, कुडाळचे मालक सुनील घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संदिप तेंडोलकर, उपाध्यक्ष श्री.संदेश गांवकर, सचिव गुरुनाथ धुरी, खजिनदार श्री. मोहीत मेथर, सहखजिनदार श्री. सचिन परब, क्रीडा समिती अध्यक्ष श्री. दर्शन शेलटे, उपाध्यक्ष श्री. शंकर सातार्डेकर, खजिनदार श्री. नित्यानंद परब, सहखजिनदार श्री. सुनील पावसकर, कुडाळ–पिंगुळी शहर कमिटी प्रमुख श्री. दिवाकर मांजरेकर, उपप्रमुख श्री. प्रकाश सातार्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या क्रीडा महोत्सवात दिवसभर क्रिकेटचे रंगतदार सामने खेळविण्यात आले. असोसिएशनचे एकूण सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. चुरशीच्या अंतिम सामन्यात गुढीपूर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले, तर पाट संघाने उपविजेतेपद मिळविले. विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाल्यानंतर सचिव श्री.गुरुनाथ धुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.









