केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : पंतप्रधानांना पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे दिले निवेदन
कुडाळ : प्रतिनिधी
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी सिंधुदुर्गातील कुडाळ येथे राजमाता जिजाऊ चौकात सकल हिंदू समाज बांधवांनी एकवटत आंदोलन छेडले. तसेच बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांबाबत भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची हमी घेण्यात यावी. पीडित हिंदू कुटुंबांना संरक्षण, न्याय व आवश्यक त्या मानवी मदतीसाठी ठोस पावले उचलण्यात यावीत आणि भारत सरकारने या प्रकरणी आपली ठाम भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडावी, अशी आग्रही मागणी करीत या मागण्यांचे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यासाठी कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे देण्यात आले.
येथील राजमाता जिजाऊ चौक येथे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बांगलादेशी जिहाद्यांचा निषेध असो, भारत माता की जय, हिंदू धर्म कि जय, हिंदू एकजुटीचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांना पाठविण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शेजारील देश बांगलादेशमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक समाजावर गेल्या काही काळापासून सातत्याने अन्याय, अत्याचार, धार्मिक छळ, मंदिरे उद्ध्वस्त करणे, मालमत्तेचे नुकसान, महिलांवरील अत्याचार तसेच जबरदस्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याच्या गंभीर घटना विविध माध्यमांतून समोर येत आहेत. हल्लीच एका हिंदू युवकाला रस्त्यावर मारहाण करून त्याला जाळण्यात आले. हा प्रकार केवळ मानवी हक्कांचा भंग नसून धार्मिक स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मूल्यांवर झालेला घाला आहे. भारत हा लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी मूल्यांवर विश्वास ठेवणारा देश असल्याने, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेश सरकारकडे राजनैतिक पातळीवर ठोस हस्तक्षेप करून हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची हमी घेण्यात यावी. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या माध्यमातून या अत्याचारांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पीडित हिंदू कुटुंबांना संरक्षण, न्याय व आवश्यक त्या मानवी मदतीसाठी ठोस पावले उचलण्यात यावीत. भारत सरकारने या प्रकरणी आपली ठाम भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडावी. मानवतेच्या आणि न्यायाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून यावर तातडीने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी विवेक पंडीत, रमाकांत नाईक, डाॅ. सुविनय दामले, बंड्या सावंत, गणेश भोगटे, प्रकाश कुंटे, सागर वालावलकर, घनश्याम परब, मंजूषा खाडये, शिवम म्हाडेश्वर, अमोल निकम, भावना वेळूकर, अंजली वालावलकर, अदिती सावंत, प्रथमेश कुडाळकर, काशिनाथ निकम, मंगेश पावसकर, काशिनाथ कोळी, संतोष परब, वैभव सावंत, गणेश कोळेकर, प्रख्यात काणेकर, अरूण बागवे, विजय वाडकर, स्वप्निल तेली, स्वानंद सामंत, भिकाजी सडवेलकर, संदीप जळवी, शैलेश वारंग, गंगाराम सावंत, वामन म्हापणकर आदींसह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमाकांत नाईक म्हणाले, बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. त्यात एका हिंदू तरुणाला जिहादी जमावाने जाळून त्याची हत्या केली तसेच एका लहान मुलीला जाळून मारले. त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने बांगलादेशाचा झेंडा पायदळी तुडवत हे आंदोलन छेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारने घुसखोरी विरोधातील मोहीम तीव्र करावी!
विवेक पंडीत म्हणाले, बांगलादेशात सातत्याने जो तिथल्या अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार चालू आहे आणि नुकतीच एका निष्पाप तरुणाची ठेचून भयानक अशी हत्या करण्यात आली, जाळण्यात आले. परत त्या मृतदेहाला फासावर लटकवण्यात आले. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. खरतर निषेध करायला शब्द अपुरे आहेत, पण शेवटी शब्दांचाच आधार घ्यावा लागतो, कारण आमच्या भावना येवढ्या तीव्र आहेत की शब्दांमध्ये त्या भावना व्यक्त होत नाहीत.पण आम्हाला या कायद्याने देशामध्ये आणि लोकशाहीने एवढ बांधून ठेवलय की आमच्या समोर दुसरा काही पर्याय नाही आहे. म्हणून आम्ही बांगलादेशात सुरू असलेल्या या कृत्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. आणि आमची भारत सरकारकडे एवढीच मागणी आहे की आता खुप झाल. देशाच्या फाळणीनंतर हिंदूना त्याकाळामध्ये परांगदा होऊन दुसर्या देशात त्यांना जावून रहावे लागले आणि तिकडे त्यांच्यावर आता अत्याचार होतायेत, तर बांगलादेश मधील सर्व हिंदूंना सन्मानाने भारतामध्ये घेवून यावे आणि त्यांचे भारतामध्ये पुनर्वसन करावे, आमची भारतातील हिंदूंची मागणी आहे. त्याचप्रमाणे बांग्लादेशींना भारतातून हाकलवून लावण्याची जी मोहीम आहे, ती आणखी शंभर पटीने तीव्र करावी. एकही बांगलादेशी आम्ही आता भारतामध्ये खपवून घेणार नाही, असा इशारा, सकल हिंदू समाजाच्या वतीने विवेक पंडीत यांनी दिला.










