बुधवारी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता
महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून आली. आज कुडाळ तालुक्यातुन पहिला अर्ज अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी दाखल केला. डिगस गावचे रहिवासी असलेल्या भानुदास रावराणे यांनी पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घावनळे येथील सखाराम उर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी घावनळे जि प मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आज देखील जि.प. साठी २८ तर पं.स. साठी ३८ जणांनी अर्ज खरेदी केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शेवटची तारीख आहे. आज २० जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदसाठी ८८ आणि पंचायत समितीसाठी १३६ असे एकूण २२४ अर्ज विक्री करण्यात आले आहेत. आज जि प साठी २८ तर प स साठी ३८ अर्ज विक्री करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या बुधवार शेवटची तारीख असल्याने आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. मात्र आज दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सचिन पाटील व संजय गवस काम पाहत आहेत.
दरम्यान उद्या बुधवार दि. २१ जानेवारी हा शेवटचा दिवस असल्याने उद्या अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे. यावेळी भाजपा – शिंदे शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुती, ठाकरे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महाविकास आघाडीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.









