ठळक घडामोडी

झाराप ग्रा.पं. स्वच्छ व हरित गाव अभियानांतर्गत राज्यात अव्वल!

आता देशपातळीवरील स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

कुडाळ : प्रतिनिधी
        शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमुल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे. हा झाराप गावासाठी मोठा बहुमान आहे. आता हि ग्रामपंचायत केंद्रस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली असून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्गच्या नावलौकिकात भर पडली असून, हि ग्रामपंचायत केंद्रस्तरीय स्पर्धेत तेलंगणा व मिझोरम राज्यातील गावांसोबत स्पर्धेत उतरली आहे. या मूल्यांकनासाठी केंद्रस्तरीय टीम पुढील आठवड्यात झाराप गावात येणार आहे. या स्पर्धेसाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ व प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहीती कुडाळ पं.स.चे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व झारापच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ग्रामपंचायतीने ‘स्वच्छ व हरित गाव’ (Theme 5 – Clean and Green Village) या संकल्पनेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांकाचे नामांकन प्राप्त केले आहे. हि ग्रामपंचायत आता देशस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली असून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या पार्श्वभूमीवर झाराप ग्रामपंचायत येथे शुक्रवारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सदर माहीती देण्यात आली. यावेळी कुडाळ पं.स.चे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पं.स.सदस्य सिताराम तेली, सरपंच दक्षता मेस्त्री, भगीरथ प्रतिष्ठान झारापचे डाॅ.प्रसाद देवधर, पं.स. विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, गजानन धर्णे व संदेश परब, ग्रामपंचायत अधिकारी गंगाराम वेंगुर्लेकर व सतीश साळगावकर, माजी सरपंच स्वाती तेंडोलकर आदींसह गावातील शासकीय कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, शिक्षक, आरोग्य सेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
       प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, पंचायत प्रगती निर्देशांक मधील स्वच्छ व हरित गाव या थीम अंतर्गत स्वयंमुल्यांकनात सन २०२३-२४ मध्ये झाराप ग्रामपंचायत राज्यात अग्रेसर ठरली आहे. आता देशपातळीवरील स्पर्धेत ही ग्रामपंचायत सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही या ग्रामपंचायतीला भेट दिली आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनीही या गावाला भेट दिली आहे. देश पातळीवर स्पर्धेसाठी या ग्रामपंचायतीची संपूर्ण टिम व झारापवासिय सज्ज झाले आहेत. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचेही मोठे योगदान मिळत आहे. केंद्रस्तरीय टीम पुढील आठवड्यात या ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी करणार आहे. गावात स्वच्छ व हरित थीम अंतर्गत सर्व उपक्रम राबविण्यात आले असून याची ही टिम पाहणी करणार आहे. गेल्या आठ दहा दिवसात या ग्रामपंचायतीचे रूप पालटले आहे.
      सरपंच मेस्त्री म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांकात एक ते नऊ इंडिकेटरमध्ये स्वयंमुल्यांकनात झाराप ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आता एक ते पाच इंडिकेटर मध्ये देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मागील आठ दहा दिवसात ग्रामपंचायतीसह प्रशासन तसेच सर्व झाराप ग्रामस्थ यासाठी मेहनत घेत आहेत. गावात विविध उपक्रम राबविण्यात आले असून लोकसहभाग मोठा आहे. या गावाची लोकसंख्या दोन हजारांहून अधिक असून गावात बायोगॅस व सोलार प्रकल्प लक्षवेधी ठरले आहेत. स्वच्छ व हरित गाव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून देशपातळीवरील स्पर्धेसाठी आम्ही सर्वजण सज्ज झालो आहोत. या ग्रामपंचायतीसाठी कुडाळ पंचायत समितीसह जिल्हा परिषद प्रशासनाचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. सिताराम तेली म्हणाले, या अभियानांतर्गत झाराप ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर मोठी झेप घेतली असून आता देशपातळीवर गरूडझेप घेण्यासाठी हि ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनासह गावातील सर्व ग्रामस्थ विशेषतः तरूण वर्ग यामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. निश्चितच हि ग्रामपंचायत देशात एक आदर्शवत अशी माॅडेल ग्रामपंचायत ठरेल. डाॅ.देवधर म्हणाले, हि ग्रामपंचायत राज्यात अव्वल ठरली आहे हा झाराप गावासाठी मोठा बहुमान आहे. देशपातळीवरील स्पर्धेत ही ग्रामपंचायत उतरली असून आता नावाजलेल्या तेलंगणा व मिझोरम राज्यातील गावांसोबत हि ग्रामपंचायत स्पर्धा करणार आहे. या देशपातळीवरील स्पर्धेतही ही ग्रामपंचायत निश्चितच अव्वल स्थान पटकावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच पुढील आठवड्यात केंद्रस्तरीय टीम पाहणीसाठी येणार असल्याचे संकेत दिले.

error: Content is protected !!