उद्या मुंबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा
गौड ब्राह्मण सभेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ
कुडाळ : प्रतिनिधी
गौड ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पुरस्कार कुडाळ मधील ज्ञाती सामाजिक कार्यकर्ते मनोज शरद वालावलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण संस्थेच्या १२८ व्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता दादर (प.) येथील शारदाश्रम विद्यामंदिर, पहिला मजला, भवानी शंकर मार्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्षपद ज्येष्ठ ज्ञाती समाजसेविका सौ. उमा अतुल नाईक भूषविणार आहेत. यावेळी गौड ब्राह्मण ज्ञातीतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण करून गौरविण्यात येणार आहे. यात गौड ब्राह्मण सभेतर्फे जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योगक मंगेश वसंत परूळेकर (अध्यक्ष – केडीजीबी संस्था, पनवेल) यांना प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, पत्रकारिता, प्रकाशन व इतिहास संशोधन आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा स्व. रावबहादूर वासुदेवराव अंतराव बांबर्डेकर इतिहास संशोधन पुरस्कार सिने पत्रकार सौ. पूजा राजन सामंत यांना देण्यात येणार आहे. गौड ब्राह्मण ज्ञाती संस्थांच्या कार्यात सहभाग तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा स्व. बा. नी. देसाई आदर्श समाजसेवक पुरस्कार ज्येष्ठ ज्ञाती सामाजिक कार्यकर्ते कर्नल अतुल गजानन नाईक (पुणे) यांना आणी सांस्कृतिक, सामाजिक व ज्ञाती कार्यात विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पुरस्कार ज्ञाती सामाजिक कार्यकर्ता मनोज शरद वालावलकर (कुडाळ) यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्ञाती कार्यात सहभाग तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा स्व. सूर्याजी रामकृष्ण उर्फ काका प्रभु कोचेकर आदर्श समाजसेवक पुरस्कार यतीन सदाशिव ठाकूर (पनवेल) यांना तर विशेष कर्तृत्व पुरस्काराने लेखक, दिग्दर्शक, निर्माता (दशावतार) सुबोध सुधीर खानोलकर यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक प्रदीप देसाई यांच्या स्वरयोग निर्मितीतून “स्वर-वसंत” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, वसंत देसाई यांच्या मराठी व हिंदी अजरामर गीतांचा सुरेल मेळ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.









