ठळक घडामोडी

आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा!

२२ मार्चपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा २३ ला नांदगाव तिठ्यावर रास्ता रोको – राजू शेट्टी

वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीयांचा मोर्चात सहभाग

बागायतदार, शेतक-यांच्या मदतीबाबत सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू बागायतींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना  राज्य सरकारकडून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी व्हावी,आणि आंबा व काजू पिकांसाठी जास्तीत जास्त हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी व व्यापारी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने ओरोस येथे गुरूवारी (आज १२ मार्च रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार,शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले.
        या मोर्चाची सुरुवात ओरोस फाटा येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर हजारो शेतकरी, बागायतदारांनी घोषणाबाजी करत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण केले. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास गावडे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उद्योजक एम. के. गावडे, तसेच जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जय जवान जय किसान”, “शेतकरी एकजूट संघटनेचा विजय असो”, “आंबा-काजूला हमीभाव नाही तर खुर्ची खाली करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच त्याचे रूपांतर सभेत झाले.
      या सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, कोकणातील आंबा-काजू बागायतदारांवर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट आले असून सरकारने तातडीने मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून कर्जमाफी द्यावी तसेच आंबा पिकासाठी हेक्टरमागे पाच लाख रुपये व काजूसाठी तीन लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
सरकारने येत्या २२ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर २३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
    दरम्यान, मोर्चा सुरू होत असतानाच पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व्यासपीठावर उपस्थित झाले. यावेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर झाला आहे. नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक व अन्य प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर मी बैठक घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली आहे. शब्दापलीकडे कृती करून सरकार आंबा व काजू बागायतदारांना न्याय देईल. बागायतदारांचा हा प्रश्न सरकार सोडवेल. कोकणासाठी निकष वेगळे असावेत असाही विचार सरकार नक्की करेल. जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी बागायतदारांच्या मोर्चास सामोरे जात दिला.
       माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.असे संकट याआधी कधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आले नव्हते. या संकटामुळे पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. सातत्याने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी होत आहे. परंतु दुर्दैवाने कालच्या बजेट मध्ये देखील सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही. सरकारने यावर ठोस भूमिका घेतली पाहिजे.मी मुख्यमंत्र्यांना भेटून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे कधीही काही मागितले नाही. नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी हा आक्रोश केला आहे. आणि तरीही सरकारकडून मदत झाली नाही तर शेतकरी यापुढे तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करतील असे वैभव नाईक यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

error: Content is protected !!