ठळक घडामोडी

हळवल फाट्याच्या वळणावर मैदा वाहतूक करणा-या ट्रकला अपघात!

एक जण गंभीर जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

अपघातप्रवण वळणावर स्पीड ब्रेकर ठरतायत धोकादायक

कणकवली : अनिकेत उचले
      मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली जवळच्या हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. ट्रक पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
   या अपघातात ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून ट्रकमध्ये साईटला बसलेला एक जण सुखरूप आहे. मात्र एका क्लिनरच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रकमधील मैद्याची पोती रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
जखमींना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा येथील बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.
    दरम्यान, शनिवारी रात्रीपासून अमावस्या सुरू झाल्याने गड नदी पुलावरील जुन्या अपघातांच्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या. हळवल फाट्यावरील हे वळण अपघातप्रवण असून याच ठिकाणी यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या वळणावर बसवण्यात आलेले स्पीड ब्रेकर अपघातांना निमंत्रण देणारे ठरत असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. पुलाच्या सुरुवातीलाच स्पीड ब्रेकर बसवण्यात आल्यास अपघातांना आळा बसेल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस प्रकाश गवस, एकनाथ सरमळकर, निलेश सोनावणे, मंगेश साटम, प्रशांत कासले आदी अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या मैद्याच्या पोत्यांमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळेत चोरी होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांना रात्रभर घटनास्थळी पहारा द्यावा लागल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीसांनी दिली.

error: Content is protected !!