न्यायमूर्ती अमित जामसंडेकर व न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट या भूमिपुत्रांचा कुडाळला गौरव
सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे आयोजन : वकिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन
कुडाळ : प्रतिनिधी
वकिली करताना नैतिकता, संयम आणि जबाबदारीचे भान अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रायल कोर्टपासून हायकोर्टपर्यंत काम करताना न्यायाधीशांना मान दिला, तर पक्षकारांकडूनही सन्मान मिळतो. त्यासाठी कायद्याचा सखोल अभ्यास, योग्य तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, भाषा प्रभुत्व, सिनिअरांचे मार्गदर्शन आणि व्यावसायिक शिस्त आवश्यक आहे. तरुण वकिलांनी या मूल्यांच्या आधारे यशस्वी वाटचाल करावी, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले. कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांतील वकिलांसाठी न्यायालयीन प्रगतीचे नवे दालन खुले झाले असून, येथून अनेक वकील पुढे न्यायमूर्ती व वरिष्ठ वकील म्हणून उच्च न्यायालयात पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने रविवारी पावशी – कुडाळ येथील शांतादुर्गा हॉल येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे भूमिपुत्र न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट (कणकवली) व न्यायमूर्ती अमित जामसंडेकर (देवगड) यांच्या सत्कार समारंभ आणि जिल्ह्यातील वकिलांसाठी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शनपर प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशिष चव्हाण, न्यायमूर्ती अमित जामसंडेकर, न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे पालक सदस्य अॅड.संग्राम देसाई व जिल्हा वकील संघटना अध्यक्ष अॅड.परिमल नाईक आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने वकिल उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी न्यायमूर्ती श्री.कर्णिक व न्यायमूर्ती श्री.चव्हाण यांचा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाल्याबद्दल न्यायमूर्ती श्री.जामसंडेकर व न्यायमूर्ती श्री.शिरसाट यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.देशपांडे यांनी तसेच व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या वतीने प्राचार्या शिल्पा मर्गज यांनी उपस्थित सर्व न्यायमूर्तींचा सत्कार केला.
न्यायमूर्ती कर्णिक म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आज हा अतिशय सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सर्किट बेंचसाठी अॅड.संग्राम देसाई यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी माझ्यावर या सर्किट बेंचची मोठी जबाबदारी दिली.
या सर्किट बेंचचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन वकिल येत असतात. सिंधुदुर्गासह सहाही जिल्ह्यातील वकिलांचे काम चांगले आहे. त्यामुळे निश्चितच या सहाही जिल्ह्यातून बरेच न्यायमूर्ती आणि सीनिअर असे चांगले वकील हायकोर्टात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपला वकिल ते न्यायाधीश पर्यंतचा प्रवास उलगडताना न्यायमूर्ती कर्णिक म्हणाले, आपल्याला जज बनायचे स्वप्न होते आणि ते पूर्णही झाले आहे. खूप मेहनत घेऊन आपण इथपर्यंत पोचलो आहे. वकिली करताना नैतिकता आणि संयम महत्त्वाचा असतो. ट्रायल कोर्टा पासून हाय कोर्टा पर्यंत काम करताना वकिलांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहीजे. न्यायाधीशांना मान दिला तर तुम्हाला पक्षकार मान देईल. त्यासाठी कायद्याचा सखोल अभ्यास केला पाहीजे. भरपूर तयारी केली पाहीजे. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले पाहीजे. व्यक्तिमत्त्व विकास, राहणीमान, भाषा प्रभुत्व तेवढेच महत्त्वाचे असते. तुम्हा सर्व वकिलांचे काम चांगले आहे. तरूण पिढीनेही कायद्याचा सखोल अभ्यास करून यशस्वी वाटचाल करावी. न्यायमूर्ती जामसंडेकर यांना कायद्यातील मोठा अनुभव आहे. त्यांचे शिक्षण मराठीत झाले आहे. सिंधुदुर्गचे हे भूमिपुत्र हायकोर्टात महत्त्वाच्या पदापर्यंत पोचले हा त्यांचा खरोखरच मोठेपणा आहे. असे भूमिपुत्र आपल्याला लाभलेत, त्यांचे अनुभव आणि आदर्श घेऊन नवीन वकिलांनी पुढे जावे, असे आवाहन न्यायमूर्ती कर्णिक यांनी केले.
न्यायमूर्ती चव्हाण म्हणाले, ट्रायल कोर्ट ते हायकोर्ट हा प्रवास वकिलांना करावा लागतो. यावेळी युक्तीवाद करताना पद्धतशीरपणे मांडणी करावी लागते. हायकोर्टात प्रॅक्टिस करताना वकिलांनी परिघ लक्षात घेऊन अगदी कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून केली पाहीजे, असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती श्री.जामसंडेकर यांनी म्हणाले, कोल्हापूरला सुरू झालेले सर्किट बेंच हे तुमच्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. वकिली पेशात असताना तो समाजातील इतरांपेक्षाही वेगळा असतो. वकिल समाजाचे प्रतिनिधित्व करतो. कामाचा अनुभव घेत असताना मोठी शक्ती व अस्त्र आपल्या हातात असते ते म्हणजे नैतिकता. म्हणून इथिक्स महत्त्वाचे आहे. त्यानुसार काम कराल तेव्हा खूप काही साध्य होते. त्यामुळे सर्वांनी नैतिकता समोर ठेवून काम केले पाहीजे. वकिलांनी प्रॅक्टिस भरपूर केली पाहीजे. आत्मचरित्रे वाचली पाहीजेत. आपल्यात व्यक्तिमत्त्व विकास केला पाहीजे. कोल्हापूरला सर्किट बेंच झाल्याने जिल्ह्यातील नवीन वकिलांना हायकोर्ट पर्यंत जाण्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे, त्यासाठी सर्वांनी भरपूर प्रॅक्टिस करावी असे आवाहन त्यांनी केले. आपला प्रवास कथन करताना ते म्हणाले, आपले देवगड येथे जि.प.च्या मराठी शाळेत शिक्षण झाले. अकरावीत असताना आपण वकिलांच्या संपर्कात आलो, आणि देवगड पासून सावंतवाडी पर्यंत प्रवास करताना या क्षेत्रातील अनेक अनुभव शिकता आले. तेव्हाचे विश्व आपल्यासाठी वेगळेच होते. पण आपल्याला यात मार्ग समजला आणि आई वडिलांच्या पाठबळामुळे आपण एलएलबीचे शिक्षण घेत आज इथपर्यंत पोचल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायाधीश श्री.देशपांडे म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच झाल्याने जिल्ह्यातील वकिसांसाठी सुवर्णसंधी आहे. जास्तीत जास्त वकिलांनी याचा अनुभव घेतला तर खंडपीठासाठी तो उपयुक्त ठरेल. त्यामुळे वकिली करताना प्रत्येक दिवशी शिकायला लागत, आणि वकिलांनी ते शिकलं पाहीजे असे त्यांनी सांगितले.
अॅड.देसाई म्हणाले, देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा जिल्ह्यात आले तेव्हा आपण त्यांच्यासमोर कोल्हापूरला सर्किट बेंचची मागणी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी त्यासाठी पुढाकार घेत आज मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात सुरू झाले आहे. सिंधुदुर्गासह लगतच्या सहा जिल्ह्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. खरोखरच कोल्हापूरला सर्किट बेंच होणे हि स्वप्नवत गोष्ट आहे. याची इमारत, इंटेरियर, बार कॉन्सिल भवन यासह अन्य गोष्टींवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे विशेष लक्ष होते, आणि त्यांनी बारीक लक्ष देऊन या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेल्या. त्यांचे यात मोठे योगदान आहे. आज सिंधुदुर्गातील वकिलांची नवीन पिढी या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करीत आहे, हे निश्चितच अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अॅड.संग्राम देसाई, सुत्रसंचालन अॅड.विलास परब यांनी केले. स्वागत अॅड.संग्राम देसाई, अॅड.परिमल नाईक, अॅड.विवेक मांडकुलकर, अॅड.उमेश सावंत, अॅड.सुहास सावंत, अॅड.अण्णा बांदेकर, अॅड.निलिमा सावंत, अॅड.अमोल सामंत, अॅड.सूर्यकांत खानोलकर, अॅड.रणजित निंबाळकर, अॅड.नंदू गुरव, अॅड.शाम सावंत, अॅड.रूपेश राणे आदींनी केले. आभार जिल्हाध्यक्ष अॅड.परिमल नाईक यांनी मानले. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्किट बेंच व उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणा-या तरूण वकिलांनी आपले अनुभव शेअर केले.








