अवैध उत्खनन व वृक्षतोडीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा
जमीन विक्रीला ठाम नकार; पर्यावरण रक्षणासाठी कोलझर गावाचा निर्धार
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह एरियात समाविष्ट असलेल्या कोलझर गावात अवैध उत्खनन व वृक्षतोडीविरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आहे. घनदाट जंगलात खनिजयुक्त मातीचे उत्खनन आणि वृक्षतोडीमुळे जैवविविधता व वन्यजीवांच्या अधिवासाला गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत गावकऱ्यांनी जमिनी न विकण्याचा निर्धार केला तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनात्मक व कायदेशीर मार्गाने पावले उचलावी लागतील असा इशाराही यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला दिला. रविवारी झालेल्या या बैठकीला शामराव देसाई, आपा देसाई, गुरुदास देसाई, शरद देसाई, पी.पी. देसाई, दीपक देसाई, मुरारी मुंगी, सुदेश देसाई, उल्हास देसाई, महादेव देसाई, दिलीप देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, आनंद देसाई, सत्यवान देसाई, अमर सावंत, देवेंद्र देसाई यांच्यासह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.









