ठळक घडामोडी

कुडाळात ‘न्यू गोल्डन सर्कस’चा थरार सुरू!

चित्तथरारक कसरती; रसिकांची भरभरून दाद

कुडाळ : प्रतिनिधी
      मूळ सांगलीचे तर सध्या कुडाळ भैरववाडी येथील रहिवासी प्रकाश माने यांच्या ‘न्यू गोल्डन सर्कस’चा दिमाखदार शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरात उत्साहात झाला. थरारक कसरतींना विदूषकांच्या विनोदी सादरीकरणाची जोड मिळाल्याने उद्घाटनाचा पहिलाच प्रयोग रंगतदार ठरला.
     कुडाळ गांधी चौक (डाॅन बाॅस्को स्कूल नजिक) येथील बांदेकर मैदानावर आयोजित या सर्कसचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते पूजन करून व फित कापून करण्यात आले. यावेळी नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, विलास कुडाळकर, उदय मांजरेकर, जीवन बांदेकर, नागेश नेमळेकर, सर्कसचे मालक प्रकाश माने आदी उपस्थित होते.
      या सर्कसमध्ये प्रत्यक्ष खेळ सादर करणारे आणि सहाय्यक मिळून सुमारे ४० कलाकारांचा सहभाग आहे. हे कलाकार पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर आणि केरळ या राज्यांतून आले आहेत. त्यांनी सादर केलेल्या विविध थरारक आणि आकर्षक कसरतींना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मृत्यूगोलात मोटारसायकल चालवणे, झुल्यावरच्या कसरती, टांगत्या साडीवरील कसरती, नेमबाजी, जगलिंग तसेच सायकलवरील कसरती यांसारख्या प्रयोगांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. चिपांझीने तर लहान मुलांना अक्षरशः भारावून सोडले. जादूच्या कलेनेही प्रेक्षकांना भारावून सोडले. विदूषकांनी आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांना मनमुराद हसवून वातावरणात रंगत आणली. कुडाळ शहरात दररोज सायंकाळी ४ वाजता आणि रात्री ७ वाजता असे दोन खेळ सादर होणार असून शनिवार, रविवार आणि बुधवारी दुपारी १ वाजता अतिरिक्त खेळ ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी यावेळी दिली.
     सर्कस क्षेत्रावर वाढत्या निर्बंधांचा परिणाम होत असल्याचेही माने यांनी सांगितले. प्राण्यांचे खेळ दाखवण्यावर बंदी असून झुल्यावरच्या काही कसरतींवरही निर्बंध आले आहेत. तसेच मृत्यूगोलात एकाच मोटारसायकलला परवानगी आहे. अशा सर्व परिस्थितीत केवळ कसरतींच्या जोरावर ही सर्कस सुरू ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!