कट्टा येथे आयोजन; शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा
भरड धान्यापासून बनविलेल्या पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धा
मालवण : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ओम साई गणेश मंगल कार्यालय ( मामा माडये हॉल), कट्टा बाजारपेठ, (तालुका मालवण) येथे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची तंत्रज्ञानाची माहिती हवी यासाठी कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन महोत्सव ठेवण्यात आले आहे. तसेच मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी मालाचे/ उत्पादनांचे नमुने यावेळी कृषी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. पौष्टिक तृणधान्य अर्थात नाचणी वरी यासारख्या भरड धान्यापासून बनविलेल्या पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी इच्छुक लाभार्थींच्या नोंदणीसाठी स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहे. मान्यवर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील आदर्श शेती करणाऱ्या निवडक शेतकऱ्यांचा सन्मान देखील यावेळी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सदर कृषी महोत्सवास बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.








