

आठवडा बाजारात विशेष मोहिम : १३,९०० रू.चा दंड वसूल
कुडाळ : प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात कुडाळ नगरपंचायतीने कडक भूमिका घेतली असून, बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व विक्रेत्यांवर कारवाई करत एकूण १३,९०० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला.
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचे न.पं. प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगरपंचायतीमार्फत सर्व व्यापारी, फेरीवाले व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा, अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कुडाळ नगरपंचायत स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी कटिबद्ध असून, या उपक्रमासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे नगरपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.









