ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला कुडाळमध्ये कार्यक्रम!

महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

कुडाळ : प्रतिनिधी
       आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १७ मार्च रोजी कुडाळ येथील एसटी डेपोच्या मैदानावर भव्य शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
        कुडाळ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय पडते, तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, रूपेश कानडे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नयना मांजरेकर, रोहित भोगटे आदी उपस्थित होते.
    यावेळी दत्ता सामंत म्हणाले की, या वाढदिवस कार्यक्रमासाठी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. या कार्यक्रमाला भाजप खासदार नारायण राणे, शिवसेना संपर्कमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आमदार निलेश राणे हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना अभिप्रेत असलेले काम करत असून पालकमंत्री नितेश राणे देखील जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. कुडाळ मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्न आमदार निलेश राणे विधानसभेत तीव्रतेने मांडत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
     वाढदिवसानिमित्त एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला तर त्यासाठी मोठी गर्दी होते आणि विरोधकांकडून त्यावर टीका केली जाते. त्यामुळे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व्यासपीठावर जाऊन आमदार निलेश राणे यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याची संधी मिळणार असल्याचे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!