ठळक घडामोडी

हिंदू धर्मजागृतीसाठी मालवणमध्ये जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन

आंगणेवाडी यात्रेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

तरुणांपर्यंत धर्मविचार पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर – अवि सामंत

मालवण : प्रतिनिधी
      हिंदू धर्मावरील वाढत्या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच तरुण पिढीमध्ये धर्माबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रोत्सवा दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसारक मालवण प्रमुख अवि सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    हॉटेल अदिश येथे आयोजित पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल मालवण प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, जिल्हा बजरंग दल संयोजक कृष्णा धुळप्पनवार, जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, अमोल गावडे, अनिकेत फाटक, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
   अवि सामंत म्हणाले की, ग्रामीण भागात आजही गरीब व गरजू हिंदू कुटुंबांना आर्थिक आमिष दाखवून धर्मांतराचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रभावी जनजागृती आवश्यक आहे. सध्याची तरुण पिढी सोशल मीडियावर सक्रिय असल्याने तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून धर्मविचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मरक्षण व हिंदू संस्कृती या विषयावर आधारित या स्पर्धेत विजेत्यांना ११,१११ रुपये, ७,७७७ रुपये, ५,५५५ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार असून उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार व उत्कृष्ट दिग्दर्शक यांनाही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.

   आंगणेवाडी यात्रेदरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विशेष कार्यालय उभारण्यात येणार असून यात्रा संपेपर्यंत कार्यकर्ते तेथे उपस्थित राहून भाविकांना हिंदू धर्माशी संबंधित माहिती देणार आहेत. महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत हिंदुत्व अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मत प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांनी व्यक्त केले.
   या मोहीमेला बळ देण्यासाठी कोकण विश्व हिंदू परिषदेचे अनिरुद्ध भावे, बजरंग दलाचे श्री. ठाकूर यांच्यासह रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंनी या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!