नूतन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले याचे प्रतिपादन
नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला!
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने आणि शहरातील नागरिकांकडून त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि या शहराला जागतिक पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे. यासाठी महायुतीसोबतच सर्व विरोधकांनाही विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी यावेळी दिली. “लोकांना अपेक्षित असलेला विकास केला जाईल. सावंतवाडी राजघराण्याने शहराला जे वैभव दिले आहे, तीच परंपरा पुढे सुरू ठेवली जाईल,” असेही त्या म्हणाल्या. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगराध्यक्षांचे स्वागत केले.
या प्रसंगी दिपाली भालेकर, तौकीर शेख, सुनील पेडणेकर, खेमराज कुडतरकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, दुलारी रांगणेकर, सुधीर आडिवरेकर, शर्वरी धारगळकर, दुर्गेश सूर्याजी, स्नेहा नाईक, संजू परब, सुकन्या टोपले, प्रतीक बांदेकर, नीलम नाईक, अजय गोंदावळे, वीणा जाधव, अनिल निरवडेकर यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.









