नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर झाला आहे, अशी माहीती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.
नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेली कुडाळ नगरपंचायत ही रेल्वे स्टेशन, बाजारपेठ व विविध सोयी-सुविधांमुळे नागरिक व पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे तसेच रेल्वे स्थानक उपलब्ध असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची ये-जा होत असते. तसेच ग्रामीण भागातील नागरिकही विविध कामांसाठी शहरात येत असतात. तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे ही नगरपंचायतीसमोर मोठी समस्या होती. घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करणे शक्य होत नव्हते.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांना शहराच्या दुष्टीने प्रकल्प होणे अत्यावश्यक असल्याने सततच्या पाठपुरावा करून आमदार निलेश राणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने नगरपंचायतीस आवश्यक असा भूखंड उपलब्ध झाला आहे. या भूखंडावर स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत रुपये 1.09 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पामध्ये खालील बाबींचा समावेश आहे –
बायोगॅस प्रकल्प (Biogas Plant)
एमआरएफ शेड (Material Recovery Facility)
सॅनिटरी लँडफिल (Sanitary Landfill)
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती, सुका कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर तसेच उर्वरित कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे यामुळे शहर अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे कुडाळ शहराला प्रथमच घनकचरा व्यवस्थापना करिता स्वतः ची जागा उपलब्ध होऊन त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होऊन स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर निर्माण करण्यास मोठी मदत होणारी आहे. याकरिता नगराध्यक्ष बांदेकर – शिरवलकर यांनी आमदार, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी यांचे विशेष आभार मानले तसेच कुडाळ शहरासाठी चांगल्या पद्धतीने प्रकल्प राबविण्याचा मानस केला आहे.









