असंख्य कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहीम; लोकवर्गणीतून बेंच, कचरा कुंड्या व सूचना फलकांचे वितरण
माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खा.लंके यांचे केले स्वागत
मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला. आज सकाळी सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्त्यांसह त्यांनी किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवत साफसफाई केली. या उपक्रमामुळे किल्ला परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.
या वेळी मालवण बंदर जेटीवर माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खासदार लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्यासमवेत कमलेश कोचरेकर, संदीप मालडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेदरम्यान खासदार लंके यांनी लोकवर्गणीतून उपलब्ध झालेल्या निधीतून किल्ला परिसरात आवश्यक असणारे बेंच, कचरा कुंड्या, सूचना फलक आदी साहित्य उपलब्ध करून दिले. ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटनस्थळाची स्वच्छता राखण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.









